|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » भाजपाची दुसरी यादी जाहीर, पुरीतून संबित पात्रा यांना उमेदवारी

भाजपाची दुसरी यादी जाहीर, पुरीतून संबित पात्रा यांना उमेदवारी 

ऑनलाईन टीम /  नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रात्री उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. मध्यवर्ती निवडणूक समितीच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 36 उमेदवारांचा समावेश असलेली आपली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रामधीलसहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. याआधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 184 जणांचा समावेश आहे. 

भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्या नावाचाही समावेश असून, पात्रा यांना ओदिशामधील पुरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपाचे ओदिशामधील प्रदेशाध्यक्ष बसंतकुमार पांडा यांना कालाहांडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रामधील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जळगाव येथून स्मिता उदय वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपाने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.  

Related posts: