|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताची विजयी सलामी, जपानला नमवले

भारताची विजयी सलामी, जपानला नमवले 

वृत्तसंस्था/ इपोह (मलेशिया)

दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती व मुख्य प्रशिक्षकाविना खेळणाऱया भारतीय हॉकी संघाने सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली. शनिवारी झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताने आशियाई चॅम्पियन जपानला 2-0 असे पराभूत केले. वरुण कुमार (24 वे मिनिट) व सिमरनजीत सिंग (56 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली. आज, भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाशी होईल.

प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया भारतीय हॉकी संघाने या सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला पण त्यांना गोल करता आला नाही. दुसऱया सत्रात मात्र भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. सामन्यातील 24 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचा फायदा घेत वरुण कुमारने शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, 29 व्या मिनिटाला भारताला दुसरा गोल करण्याची संधी होती पण मनदीप सिंगने ही संधी गमावली. यामुळे मध्यंतरापर्यंत भारतीय संघाकडे 1-0 अशी आघाडी होती.

तिसऱया सत्रात मात्र जपानने आक्रमक खेळ करत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय संघाने जपानचे प्रयत्न हाणून पाडले. 33 व्या मिनिटाला जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला खरा पण त्यांना गोल काही करता आला नाही. तसेच 35 व्या मिनिटालाही जापनीज खेळाडू केंजी किटाजोला चेंडू गोल जाळय़ापर्यंत पोहोचवता आला नाही. यानंतर अखेरच्या सत्रात भारताचेच वर्चस्व राहिले. 55 व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला पण वरुण कुमारला गोल नोंदवता आला नाही. यानंतर, लगेचच पुढील मिनिटाला सिमरनजीत सिंगने मैदानी गोल करत भारताला 2-0 असे आघाडीवर नेले. यानंतर, शेवटपर्यंत जपानने गोल करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. अखेरीस भारताने हा सामना 2-0 असा जिंकत विजयी सलामी दिली.