|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » अनुभवी धोनी, विराटविरुद्ध भारी!

अनुभवी धोनी, विराटविरुद्ध भारी! 

आयपीएल 12 : फिरकीपटू हरभजन सिंग व इम्रान ताहीरचे प्रत्येकी 3 बळी, चेन्नई सुपरकिंग्सची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ चेन्नई

हरभजन सिंगने फिरकी गोलंदाजीतील गतवैभवाची छोटीशी चुणूक दाखवल्यानंतर विद्यमान विजेत्या चेन्नई सुपरकिंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा आयपीएल सलामीच्या लढतीत 7 गडी राखून पराभव केला. मंदगती, संथ गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर प्रारंभी आरसीबीचा डाव अवघ्या 70 धावांमध्येच गुंडाळला गेला तर प्रत्युत्तरात चेन्नईला देखील विजयाचे हे किरकोळ लक्ष्य गाठण्यासाठी चक्क 17.4 षटके खेळावी लागली.

या निकालासह आरसीबीचा चेन्नईविरुद्ध विजयाचा दुष्काळ येथेही कायम राहिला. शिवाय, आयपीएल इतिहासात सर्वात नीचांकी धावांच्या निकषावर आरसीबीची सहाव्या स्थानी नोंद झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीची हरभजनला (4 षटकात 20 धावात 3 बळी) नवा चेंडू सोपवण्याची अनोखी चाल चांगलीच यशस्वी ठरली. डावातील चौथ्या षटकात भज्जीने प्रतिस्पर्धी कर्णधार विराट कोहलीला 6 धावांवर बाद केले आणि प्रारंभीच बसलेल्या या जबरदस्त धक्यातून बेंगळूरचा संघ अगदी शेवटपर्यंत सावरु शकला नाही.

धोनीने खेळपट्टीचे स्वरुप बिनचूक ओळखले होते. त्यामुळे चेन्नईला  सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखण्यात कमालीचे यश प्राप्त झाले.

एकीकडे, हरभजन भेदक मारा करत असताना, दुसरीकडे, इम्रान ताहीरने 9 धावातच 3 फलंदाज गारद करत आरसीबीच्या अडचणीत आणखी भर घातली. ताहीरच्या भेदक गुगलीवर आरसीबीच्या फलंदाजांकडे काहीच उत्तर नव्हते. फिरकीला पोषक खेळपट्टीवर रवींद्र जडेजा देखील फारसा मागे राहिला नाही.  त्याने 4 षटकात 15 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले. खेळपट्टी संथ गोलंदाजीला पोषक आहे, हे नजरेत आल्यानंतर हरभजनने अतिशय चपळाईने वेग आणखी कमी केला.

विराटचा पूलचा फटका चुकल्यानंतर जडेजाने मिडविकेटवर सोपा झेल घेतला. त्यानंतर डीव्हिलिर्स बाद होणे आणखी आश्चर्याचे ठरले. पार्थिव पटेलने 29 धावा करत एकाकी झुंज साकारली, इतक्यावरच बेंगळूरला काय ते समाधान मानावे
लागले. 

संक्षिप्त धावफलक : आरसीबी : 17.1 षटकांत सर्वबाद 70 (विराट कोहली 12 चेंडूत 6, पार्थिव पटेल 35 चेंडूत 2 चौकारासह 29, मोईन अली 9, डीव्हिलीयर्स 9, हेतमार 0, शिवम दुबे 2, ग्रँडहोम 4, नवदीप सैनी 2, चहल 4, उमेश यादव 1, मोहम्मद सिराज नाबाद 0, हरभजन सिंग 20 धावांत 3 बळी, इम्रान ताहीर 9 धावांत 3 बळी, रविंद्र जडेजा 15 धावांत 2 बळी).

चेन्नई सुपरकिंग्स : 17.4 षटकात 3 बाद 71 (अम्बाती रायुडू 42 चेंडूत 28, सुरेश रैना 19, केदार जाधव नाबाद 13)