|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इथे वाघासोबत खेळला जातो खेळ

इथे वाघासोबत खेळला जातो खेळ 

हेवाळे गाव जपतोय शिमगोत्सवातील आगळी प्रथा : वाघखेळ पाहण्यासाठी भाविकांची होते गर्दी  

तेजस देसाई / दोडामार्ग:

 पारंपरिक लोककला व संस्कृती हे कोकणचे खास वैशिष्टय़च. दोडामार्ग तालुक्मयातील हेवाळे या गावी स्तुत्य असाच ‘वाघखेळा’ सारखा लोककलेतील अनोखा प्रकार शिमगोत्सवात खेळला जातो. हा असा अनोखा वाघखेळ व   घोडेमोडणी उत्सव पाहण्यासाठी हेवाळे गावच्या शिमगोत्सवाला दरवषी भाविकांची अलोट गर्दी लोटते. हेवाळेतील हा अनोखा ‘वाघखेळ’ यावषी शिमगोत्सवात  मंगळवारी सातव्या दिवशी सायंकाळी खेळला जाणार असून दोडामार्गसह सिंधुदुर्ग जिल्हय़ातील भाविकांची हेवाळेत गर्दी लोटणार आहे.

तळकोकणातील दोडामार्ग तालुक्मयात वसलेल्या हेवाळे गावात वर्षानुवर्षे शिमगोत्सवात घोडेमोडणी उत्सवाबरोबरच अनोखा वाघखेळ खेळण्याची परंपरा आहे. ग्रामदेवता श्री देव सातेरी मायगांवसच्या चव्हाटा मंदिराच्या ठिकाणी होळीच्या आवारात शिमगोत्सवाच्या पाचव्या दिवशी सायंकाळी हा असा अनोखा वाघखेळ खेळला जातो. मात्र, यावषी काही कारणास्तव हा खेळ सातव्या दिवशी होणार आहे. मानवनिर्मित असलेला हा अनोखा खेळ भाविकांच्या अलोट गर्दीत दरवषी संपन्न होतो. हेवाळे गावची ग्रामदेवता ‘श्री मायगांवस’ हा या गावात पूर्वी एकाच तळीवर ‘वाघ’ व ‘शेळी’ यांना पाणी पाजायचा, अशी आख्यायिका आहे. श्री देव मायगांवसच्या कृपेने आणि सामर्थ्याने असे असतानाही कधीही वाघाने शेळीवर हल्ला केलेला नसल्यानेच ही अशी अनोखी परंपरा हेवाळे गावात रुढ झाली.

होळी पौर्णिमेला चव्हाटा मंदिराकडे होळी उभारून हेवाळे गावच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. तिसऱया व चौथ्या दिवशी गावात ‘खेळे’ खेळले जातात. चौथ्या दिवशी गावचे ‘रोंबाट’ व पाचव्या दिवशी घोडेमोडणी, वाघखेळ व रात्री न्हावनाचा कार्यक्रम असतो. सहाव्या दिवशी शिळय़ा न्हावनाने गावच्या शिमगोत्सवाची  सांगता होते. पाचव्या दिवशी हेवाळे गावात रंगणारा अनोखा वाघखेळ व न्हावनाचा कार्यक्रम विशेष महत्वाचा असतो. हा वाघखेळ पाहण्यासाठी तालुक्मयातून दरवषी भाविक हेवाळेत गर्दी करतात. रात्री पालखीची ओटी भरण्यासाठी हेवाळेतील माहेरवासिनी न चुकता हजेरी लावतात. ओटय़ा भरण्याचा रात्री कार्यक्रम झाल्यानंतर रात्री 12 वाजता देवता पालखी गावच्या मुख्य सातेरी-मायगवसच्या ‘राय’ मधील मंदिरात भेटीला जातात व होळीच्या सहाव्या दिवशी शिळय़ा न्हावनाने गावच्या शिमगोत्सवाची सांगता होते.

बुधवारी शिमगोत्सवाची सांगता

दरवषी पाच दिवसांचा असणारा हेवाळे गावचा शिमगोत्सव यावषी सात दिवसांचा होत आहे. मंगळवारी सायंकाळी घोडेमोडणी, वाघखेळ व रात्री पालखी कार्यक्रम आणि न्हावण तर बुधवारी शिळय़ा न्हावणाने शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. मंगळवारी रात्री गावातील युवा मंडळींचा सामाजिक नाटय़प्रयोग  होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन हेवाळे ग्रामवासीयांनी केले आहे.

कसा असतो वाघखेळ?

 आता वाघखेळ म्हणजे काय? असा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. अर्थात हा खराखुराच वाघखेळ असतो. मात्र, वाघ हा गावातीलच एकजण असतो. अर्थात गावातीलच एक व्यक्ती वाघाचे कपडे परिधान करून येतो. घोडेमोडनी संपताच मंदिराच्या आवारात दाखल होत देवतांचा आशीर्वाद घेऊन या खेळाला सुरुवात होते. वाघाचे कपडे परिधान केलेली ती व्यक्ती टिवल्या बावल्यांनी रंगलेल्या लहान मुलांसमवेत मंदिराच्या आवारात खेळते व खेळातूनच सर्व उपस्थित भाविक व गावकरी मंडळींना वर्षभराची रखवाली देते. याठिकाणी आलेली प्रत्येक व्यक्ती या वाघाकडून अर्थात वाघरुपी मानवाकडून आपल्या डोक्मयावर धुळवड घेऊन देवतांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर धर्मिक रुढी पार पाडून बंदुकीच्या बारांनी वाघाला ठार मारून व देवतांचा आशीर्वाद घेऊन हा अनोखा वाघखेळ आटोपता घेण्यात येतो.