|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात मशीद पेटवून देण्याचा प्रयत्न

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात मशीद पेटवून देण्याचा प्रयत्न 

कॅलिफोर्निया

 अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एक मशीद पेटवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. मशिदीच्या पार्किंग क्षेत्रातून एक पत्रक मिळाले असून यात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमधील गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख होता. या हल्ल्यात 50 जणांना जीव गमवावा लागला होता. या पत्रकामुळे परिसरातील मुस्लीम समुदायामध्ये दहशत पसरली आहे. हे प्रकरण वंशद्वेषाचे असल्याचे मानत पोलिसांनी तपासास प्रारंभ केला आहे. सॅन दियागोपासून 48 किलोमीटर अंतरावरील एस्कांडिडो शहराच्या मशिदीत झालेल्या या घटनेत कोणतीच जीवितहानी झालेली नाही. पण मशिदीच्या बाहेरील भागाला नुकसान पोहोचले आहे. आगीच्या घटनेवेळी मशिदीत 7 जण उपस्थित होते.

 

 

अग्निशमन पथक येण्यापूर्वीच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. एखादा मानसिक रुग्णच धार्मिक स्थळ पेटविण्याचा विचार करू शकतो. या कृत्यासोबतच न्यूझीलंडच्या घटनेचा उल्लेख करून त्याने सर्व मर्यादा ओलांडल्याचे विधान क्षेत्रीय इस्लामिक सेंटरचे सदस्य युसूफ मिलर यांनी केले आहे.