|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कुवारबावमध्ये शिवसेनेला ‘दे धक्का’

कुवारबावमध्ये शिवसेनेला ‘दे धक्का’ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राजकीयदृष्टय़ा अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला धोबीपछाड देत गाव विकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे. गावविकास आघाडीने थेट सरपंचपदाबरोबर 8 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावे लागले. सरपंचपदी गावविकास आघाडीच्या मंजिरी पाडाळकर या 98 मतांनी विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असले स्वरूप प्राप्त झालेल्या या निवणुकीत सेनेला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष गावविकास आघाडीच्या झेंडय़ाखाली एकत्र आले होते.

सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजपा, स्वाभिमान, राष्ट्रवादी, मनसे, भारिप अशा सर्व राजकीय संघटना एकवटल्या होत्या. विशेष म्हणजे सेना-भाजची राज्यस्तरावर युती होऊनही या निवणुकीत भाजपा सेनेविरोधात होती. दोन्ही बाजूनी सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र ग्रामपंचायत राखण्यात सेनेला अपयश आले आहे.

सोमवारी तहसीलदार कार्यालयात सुरू झालेल्या मतमोजणीचा कल सुरूवातीपासून गावविकासकडे झुकताना दिसत होता. प्रभाग 1 मध्ये गाव विकासचे नरेश विलणकर (417) यांनी सेनेचे शैलेंद्र चव्हाण (311) यांच्यावर तर  गावविकासच्या सुनिला नलावडे (389) यांनी सेनेच्या रिध्दी बामणे यांच्यावर (332) विजय मिळवला. तर सेनेच्या रंजना विलणकर (372) यांनी गावविकासच्या सपना सावंत (337) यांना पराभूत केले.

प्रभाग 2 मध्ये देखील सेनेला जोरदार धक्का मिळाला. सरपंच पदासाठी  पाडाळकर यांनी 70 मतांची आघाडी घेतली. या प्रभागात गावविकासचे गणेश मांडवकर (303) यांनी सेनेचे महेंद्र सावंत (265) तर गावविकासच्या प्राजक्ता चाळके (308) यांनी सेनेच्या ऋतुजा भाटे (250) यांच्यावर मात केली. तर सेनेच्या वैदेही दुधवडकर (296) यांनी गावविकासच्या सिमा वणजू (273) यांच्यावर विजय मिळवला. 

प्रभाग 3 मध्ये  संरपंचपदासाठी पाडाळकर यांना जांभेकर यांच्यापेक्षा केवळ 15 मतांची आघाडी मिळाली. सदस्यपदासाठी गावविकासचे सचिन उर्फ बबलू कोतवडेकर (285) यांनी सेनेचे अनिल काटे (217) यांच्यावर मात केली. या प्रभागात माजी पं.स.सभापती व गावविकासाचे उमेदवार निलेश लाड यांना  पराभवाचा सामना करावा लागला. लाड यांना 209 तर सेनेचे जिवन कोळवणकर यांना 300 मते मिळाली. सेनेच्या स्नेहल वैश्यंपायन (288) यांनी गावविकासच्या श्रेया शिवलकर (212) यांना पराभूत केले. 

प्रभाग 4 मध्ये सरपंचपदासाठी पाडाळकर यांना 108 मतांची निर्णायक आघाडी मिळाली. सदस्यपदाच्या तीनही जागा गावविकासने जिंकल्या. यामध्ये गौरव पावसकर (429) यांनी सेनेचे माजी सरपंच विनोद झाडगांवकर (327) यांना जोरदार धक्का दिला. त्याचबरोबर रमेश चिकोडीकर (452) यांना रमेश सावंत यांना (299) यांच्यावर तर गावविकासच्या अनुश्री आपटे (436) यांनी अपर्णा वाडकर (316) यांच्यावर विजय मिळवला. 

प्रभाग 5 मध्ये शिवसेने मोठी मुसंडी मारली. सरपंचपदासाठी सेनेच्या साधना जांभेकर यांनी तब्बल 105 मतांची आघाडी घेतली. मात्र त्यांना पाडाळकर यांनी घेतलेली आघाडी तोडता आली नाही. मंजिरी पाडाळकर यांना एकूण 1571 तर  सेनेच्या जांभेकर यांना 1473 मते मिळाल्याने 98 मतांनी गावविकासच्या पाडाळगर यांना विजयी घोषीत करण्यात आले.

प्रभाग 5 मधील तिन्ही जागांवर सेनेने विजय मिळवला. चेतन सावंत (364) यांनी चंद्रकात जाधव (116), रिया सागवेकर (331) यांनी आरती पावसकर (143) व विद्यमान सरपंच साक्षी भूते (326) यांनी अनुश्री आपटे (145) यांना मात देत विजय संपादन केला.

गावविकासच्या सर्व विजयी उमेदवारांचे स्वाभिमानचे सरचिटणीस निलेश राणे, राष्ट्रवादीचे कुमार शेटय़े, भाजपाच्या पदाधिकाऱयांनी अभिनंदन केले. ग्रामपंचायतीवर गावविकास आघाडीने विजय प्राप्त करताच सेनेच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले होते.