|Thursday, September 19, 2019
You are here: Home » leadingnews » मला अन् प्रणितीला दिली होती भाजपने ऑफर ; सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट

मला अन् प्रणितीला दिली होती भाजपने ऑफर ; सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

मला व मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसभवनमध्ये बोलताना केला.

काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसभवनमध्ये आयोजित सभेत बोलताना भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. भाजपवाल्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती. इतकेच काय आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला. 

आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. त्यामुळे आम्ही दोघांनीही भाजपच्या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला. भाजप जातीधर्माचे राजकारण करतेय. हुकूमशाही राजवट आणण्याचा  त्यांचा प्रयत्न होतोय. लोकशाहीला हे घातक असून,या निवडणुकीत लोक भाजपला थारा देणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही शिंदे यांनी टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे रात्रंदिवस एक करून संविधान लिहिले. भारतीय संविधानाचा ढाचा सर्वधर्मसमभाव आहे. पण आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूकडून संविधानाला गाढण्याचे काम होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे यांनीही भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली.