|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » टेंबवलीतील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

टेंबवलीतील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या 

कीटकनाशकही केले होते प्राशन : मानसिक संतुलन बिघडल्याने कृत्य

प्रतिनिधी / देवगड:

टेंबवली सडा येथील सौ. योगिता संजय शेडगे (38) या विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गळफास लावून घेण्यापूर्वी तिने कीटकनाशकही प्राशन केले होते. ही घटना बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. मानसिक संतुलन बिघडल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. जामसंडे येथील गॅरेज व्यावसायिक संजय ऋषी शेडगे यांच्या त्या पत्नी होत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड-कट्टा भंडारवाडी येथील संजय शेडगे यांनी टेंबवली सडा येथील सागवेकर स्टॉपनजीक घर बांधले आहे. तेथे ते पत्नी व मुलगी स्वरा हिच्यासमवेत राहत होते. त्यांना रोमा नावाची चार महिन्यांची मुलगी असून तिचा सांभाळ नातेवाईक करतात. योगिता या मनोरुग्ण होत्या. रोमाचा सांभाळ करता येत नसल्याबाबत त्या सतत विचार करत राहायच्या. यातच त्यांची मानसिक स्थिती अजूनच बिघडली होती.

दरम्यान, बुधवारी सकाळी पती संजय आपल्या कामाच्या ठिकाणी गॅरेजमध्ये गेले. तर स्वरा ही शाळेत (दुसरी) गेली होती. शाळा सुटल्यानंतर संजय हे स्वराला सोडण्यासाठी घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी पत्नी योगिताला हाका मारल्या. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा जोरात ढकलून उघडला. यावेळी योगिता घराच्या स्लॅबच्या हुकाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली.

घटनेची माहिती संजय शेडगे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर पानसरे करत आहेत.

गळफास घेण्यापूर्वी घेतले कीटकनाशक

योगिताला गळफास लावलेल्या स्थितीत पाहताच पती संजय व मुलगी स्वराला मोठा मानसिक धक्का बसला. त्यातून सावरत संजय यांनी तिला खाली उतरविले व तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी योगिता मृत झाल्याचे सांगितले. दरम्यान, गळफास लावून घेण्यापूर्वी योगिताने कीटकनाशक प्राशन केले होते. घटनास्थळी कीटकनाशकाची बाटली आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.