|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लीबिया पुन्हा गृहयुद्धाच्या उंबरठय़ावर

लीबिया पुन्हा गृहयुद्धाच्या उंबरठय़ावर 

बंडखोर जनरलच्या फौजांची कूच : राजधानी त्रिपोलीच्या दिशेने वाटचाल

वृत्तसंस्था/ त्रिपोली 

मागील 8 वर्षांपासून अस्थिरतेच्या आगीत होरपळणारा उत्तर आफ्रिकेतील देश लीबियावर पुन्हा एकदा गृहयुद्धाचे संकट घोंगावत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध या देशाचे बंडखोर जनरल खलीफा हफ्तार स्वतःच्या सैन्यासह राजधानी त्रिपोलीच्या दिशेने कूच करत आहेत. जनरल हफ्तार यांना सौदी अरेबिया तसेच इजिप्तसह रशियाकडून मदत मिळत असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला आहे. पण रशियाने हा आरोप फेटाळला आहे.

2011 मध्ये लीबियाचा हुकुमशहा कर्नल मुअम्मर गद्दाफीचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यापासून हा देश स्थैर्यासाठी व्याकुळ झाला आहे. राजधानी त्रिपोलीत संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेचे समर्थनप्राप्त सरकार आहे. पण देशाच्या पूर्व भागावर जनरल खलीफा हफ्तार यांच्या लीबियन नॅशनल आर्मीचा कब्जा असून ते आता पंतप्रधान फयाज अल सिराज यांच्या सरकारला आव्हान देत आहेत. जनरल खलिफा हफ्तार यांचा सामना केला जाणार असल्याचे सरकारच्या नियंत्रणाखालील सैन्याने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर लीबियात गृहयुद्ध छेडले जाण्याची शक्यता वाढली आहे.

सरकारचे सैन्यही सज्ज

सैन्याचा पुढील टप्पा अल-अजीजिया शहर असून त्याला त्रिपोलीचे प्रवेशद्वार म्हटले जाते असे जनरल हफ्तार यांचे प्रवक्ते अहमद अल मेसमारी यांनी सांगितले आहे. हफ्तार यांच्या सैन्याचा सामना करण्यासाठी शासकीय सैन्याने किनारी शहर मिसरातामध्ये तैनात मशीनगनने युक्त पिकअप ट्रक्स त्रिपोलीत आणले आहेत.

सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समुदायाने लीबियाचे सरकार आणि बंडखोर जनरल हफ्तार यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. जर्मनीने या संकटावर तोडगा शोधण्यासाठी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे.  याचदरम्यान सर्वांचा नजरा संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस आणि जनरल हफ्तार यांच्या बैठकीवर केंद्रीत झाल्या आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱया संमेलनात भाग घेण्यासाठी हफ्तार यांचे मन वळविण्याचा गुतेरेस यांचा प्रयत्न आहे. या संमेलनात लीबियाच्या भवितव्याबद्दल सर्वसंमती निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.

बंडखोरांचा शहरावर कब्जा

जनरल हफ्तार यांच्या सैन्याने राजधानी त्रिपोलीपासून 50 मैल अंतरावरील गरयान शहरावर कब्जा केला आहे. कब्जापूर्वी जनरल हफ्तार यांचे सैन्य आणि सरकारी सैन्यादरम्यान तुंबळ संघर्ष झाला. या संघर्षानंतर बंडखोर जनरलने स्वतःच्या सैन्याला त्रिपोलीच्या दिशेने आगेकूच करण्याचा आदेश दिला आहे. आम्ही त्रिपोलीत पोहोचत आहोत अशी त्यांनी एका ध्वनिसंदेशाद्वारे घोषणा केली आहे.

Related posts: