|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गच्या आरोग्याचे कोणाला ना देणं.. ना घेणं

दोडामार्गच्या आरोग्याचे कोणाला ना देणं.. ना घेणं 

अखेर दोन डॉक्टरांचा करार संपला

एका डॉक्टरवर रुग्णालयाचा भार

रुग्णांची होणार परवड

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्वाची ठरत आहे. मात्र, ही सेवा व्हेंटिलेटरवर येणार असल्याचे चित्र निर्माण झाले. सध्या तीन डॉक्टर येथे कार्यरत आहेत. यातील दोन डॉक्टरांचा करार अखेर गुरुवारी संपला असून पुन्हा एका डॉक्टरांना ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हाकावा लागत आहे. त्यामुळे दोडामार्गवासीयांची परवड होणार, हे निश्चित आहे. डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना विचारले असता आपण वरिष्ठांना कळविले आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, तूर्त तरी डॉ. ऐवळेंच्या साथीला कोणीही साहाय्यक डॉक्टर गुरुवारी तरी देण्यात आली नव्हता. सध्या तापसरी आहेच. शिवाय जवळील आरोग्य केंद्रातील रुग्ण दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठवल्यावर मोठी तारांबळ उडणार आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऐवळे हे स्त्राr रोग तज्ञ आहेत. त्यांना शस्त्रक्रिया विभागाबरोबर कार्यालयीन कामकाजही सांभाळावे लागते. त्यामुळे डॉ. ऐवळे यांची दमछाक उडणार आहे.

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील खेडोपाडय़ातील गावांसह दोडामार्ग – गोवा सीमेवरील गोवा राज्यातील गावांतील रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऐवळे यांच्या कुशल नियोजनातून या ग्रामीण रुग्णालयात उत्तम सुविधा सध्या मिळत आहेत. यापूर्वी अनेकवेळा एवढय़ा मोठय़ा विस्ताराच्या रुग्णालयाचा कारभार डॉ. ऐवळेंना एकहाती सांभाळावा लागला होता. मात्र, एका डॉक्टराने चौवीस तास सेवा द्यायची तरी कशी? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर आंदोलने, उपोषणे झाल्यावर डॉ. विष्णू व डॉ. पंकज अशा दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे डॉ. ऐवळे यांच्यावरचा कामाचा ताण कमी झाला होता. तिघांच्या एकमेकांना असलेल्या साहय्याने गेली वर्षभर व्यवस्थित कामकाज सुरू आहे. मात्र, डॉ. विष्णू व डॉ. पंकज यांचा करार येत्या 4 एप्रिलला संपला आहे.

आचारसंहितेतही होऊ शकतो उद्रेक

तालुकाभरातील रुग्णांना रुग्णसेवा मिळण्यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय महत्वाचे ठरत आहे. असे असताना एका डॉक्टरावर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार संपविणे चुकीच आहे, असे रुग्णांचे म्हणणे आहे. दोन डॉक्टरांचा करार संपत असून अधिकाऱयांनी त्या ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे रिपोर्टिंग ऑफिसर प्रा. संदीप गवस, हेल्पलाईन संघटनेचे अध्यक्ष वैभव इनामदार व टीम यांनी केली होती. मात्र, त्याकडे गांभीर्याने घेतले गेले नाही. दोडामार्गला डॉक्टर येण्यासाठी आंदोलनेच का करावी लागतात. असा सवाल करीत आता मात्र आचारसंहिता असली तरी ठिक आहे. पण, डॉक्टर नेमा अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे विविध संघटनांचे म्हणणे आहे.