|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अल्पेश ठाकोरचा काँग्रेसला रामराम

अल्पेश ठाकोरचा काँग्रेसला रामराम 

लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठा झटका : तीन आमदार भाजपच्या वाटेवर

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठा झटका बसला आहे. आमदार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून ठाकोर समुदायाचे तीन आमदारही पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत. अल्पेश सध्या गुजरातबाहेर असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 2017 च्या गुजरात निवडणुकीपूर्वी अल्पेश यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ठाकोर समुदायावर त्यांचा मोठा प्रभाव असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.

आपल्या समुदायाचे लोक आणि समर्थकांमध्ये ‘फसविले गेल्याची’ आणि ‘उपेक्षित’ राहिल्याची भावना निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची धुरा काही कमकुवत नेत्यांच्या हातात असल्याचा आरोप ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी जानेवारी महिन्यात केला होता.

क्षत्रिय ठाकोर सेनेच्या सुकाणू समितीची बैठक मंगळवारी रात्री उशिरा अहमदाबादमध्ये पार पडली आहे. राधनपूरचे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, बायडचे आमदार धवलसिंग झाला आणि बहुचराजीचे आमदार भरत ठाकोर यांना ठाकोर सेनेने इशारा दिला होता. ठाकोर समुदायाच्या आमदारांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकोर सेनेने केली आहे. हे तिन्ही आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

गुजरातमध्ये काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील काही जणांना राज्यात मंत्रिपदही मिळाले असल्याने अल्पेश ठाकोर देखील हा मार्ग चोखाळू शकतात.

Related posts: