|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘अस्मिता बाईक रॅली’चा उपक्रम कौतुकास्पद

‘अस्मिता बाईक रॅली’चा उपक्रम कौतुकास्पद 

प्रतिनिधी/ बेळगाव

तरुण भारत अस्मिता व्यासपीठातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित भव्य बाईक रॅलीमधील यशस्वी सहभागाबद्दल महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध विभागांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तरुण भारत कार्यालयात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. अस्मिता बाईक रॅलीच्या माध्यमातून एक आगळा उपक्रम उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलावर्गाने तरुण भारतचे आभार मानले.

या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि लक्ष्मी प्रतिमा पूजनाने झाला. तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू, मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर, व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, यांच्यासह बाईक रॅलीमध्ये सन्मान लाभलेल्या गौरी हेरेकर आणि आलिशा पाटील आदी सदस्य व्यासपीठावर होते. तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी आपले मनोगत मांडले. तसेच महिलांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रशंसोद्गार काढले.

गुढीपाडव्याच्या सायंकाळी शहरातून निघालेली बाईक रॅली भव्यदिव्य ठरली होती. या बाईक रॅलीने उपस्थितांना एक तेजोमय अनुभव दिला होता. या अनुभवाच्या संदर्भात उपस्थित महिलांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. महिलांना स्वत:ची नव्याने ओळख करून देणारा हा सोहळा ठरल्याची प्रतिक्रिया महिलावर्गाने मांडली. तसेच हा उपक्रम दरवर्षी अशाच पद्धतीने भव्यदिव्य व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी आलिशा पाटील आणि गौरी हेरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून इतरांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. अस्मिताच्या समन्वयिका पूजा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केले.