|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » Top News » सुहास मर्चंट यांनी स्वीकारली क्रेडाई पुणे मेट्रो ची धुरा

सुहास मर्चंट यांनी स्वीकारली क्रेडाई पुणे मेट्रो ची धुरा 

 पुणे / प्रतिनिधी  :  पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुहास मर्चंट यांनी आज बांधकाम व्यावसायिकांसाठीच्या पेडाई पुणे मेट्रो अर्थात ‘कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांची ही निवड 2019 ते 2021 या कालावधीसाठी असणार आहे.

मर्चंट यांनी मावळते अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी पेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, पेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख आणि पेडाईचे संस्थापक कुमार गेरा आणि रामकुमार राठी आदि उपस्थित होते.

मर्चंट हे पेडाईचे सहसंस्थापक असून त्यांनी याआधी संस्थेचे मानद सचिवपदही भूषवले आहे. मर्चंट याच्याबरोबरच्या नवीन कार्यकारिणीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोहित गेरा, अनिल फरांदे, रणजीत नाईकनवरे, किशोर पाटे, मनीश जैन आणि अमर मांजरेकर या सर्वांचा उपाध्यक्ष म्हणून समावेश आहे. कार्यकारिणीत आदित्य जावडेकर- सचिव, आय. पी. इनामदार- खजिनदार आणि अश्विन त्रिमल- सहसचिव यांचीही निवड झाली आहे.

पेडाई पुणे मेट्रो ही संस्था याआधी ‘प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे’ या नावाने ओळखली जात असे. त्या काळापासून म्हणजेच 1987 पासून मर्चंट हे संस्थेशी निगडित आहेत. त्यांनी 1987 ते 1999 या कालावधीत संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून, तर 1999-2002 या कालावधीत संस्थेचे मानद सचिव म्हणून पद भूषविले. इतकेच नव्हे, तर गेली तब्बल 9 वर्षे त्यांनी पेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मर्चंट यांच्याकडे बांधकाम क्षेत्रातील 45 वर्षांचा अनुभव आहे. केवळ बांधकामच नव्हे तर बांधकामाशी संलग्न असलेल्या आरसीसी डिझाईन, एस्टिमेशन, कच्च्या मालाची खरेदी, वास्तूस्थापत्य, व्यवस्थापन, विपणन, कायदेशीर बाबी आणि व्यवसाय वृद्धी या विविध क्षेत्रांची त्यांना उत्तम जाण आहे. सध्या ते कल्पतरू समुहाबरोबर कार्यरत आहेत. मर्चंट हे मूळचे अभियंता असून आयआयटी पवई येथून त्यांनी एम टेकचे शिक्षण पूर्ण केले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून वाखाणल्या गेलेल्या मर्चंट यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावरही आपले नाव कोरले. रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून ते सामाजिक जीवनात देखील सक्रिय असतात.