|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » काँग्रेसमुळे वाढले नक्षलींचे मनोबल!

काँग्रेसमुळे वाढले नक्षलींचे मनोबल! 

छत्तीसगडमधील सभेत मोदी विरोधकांवर बरसले : काँग्रेसच्या घोषणापत्रामुळे देशविरोधी शक्ती सक्रीय, सर्जिकल स्ट्राइकचा केला उल्लेख

वृत्तसंस्था/  कोरबा

लोकसभा निवडणुकीकरता छत्तीसगडच्या कोरबा येथील प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंगळवारी सडकून टीका केली आहे.  काँग्रेस पक्षात नक्षलवाद्यांना क्रांतिकारी म्हटले जाते. विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस नेत्यांच्या विधानांकडे लोकांचे लक्ष वळविले होते. काँग्रेसकडून मोकळीक मिळाल्याने नक्षलवाद्यांचे हल्ले होत आहेत. काँग्रेसचे ‘ढकोसला पत्र’ (घोषणापत्र) नक्षलींचे मनोबल वाढवत असल्याचा आरोप मोदींनी केला.

पंतप्रधानांनी नक्षली हल्ल्यात जीव गमाविणारे भाजप नेते भीमा मांडवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्या भागात नक्षलींचा प्रभाव ओसरला होता, तेथेच पुन्हा हल्ला करण्यात आला असून हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने देशद्रोहाचा कायदा संपुष्टात आणणार असल्याची घोषणा केल्याने देशविरोधी शक्तींचे मनोबल वाढले आहे. छत्तीसगडला पुन्हा हिंसाचारच्या दरीत लोटण्याचा कट रचला जात असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

नक्षली आणि देशाचे तुकडे करू पाहणाऱया लोकांसोबत काँग्रेसचा पंजा आहे. काँग्रेसचे सर्वसामान्यांशी असलेले नाते कित्येक वर्षांपूर्वीच तुटले आहे. या कारणामुळे देशाच्या लोकांच्या भावना आणि त्यांच्या गरजा काँग्रेसला समजतच नसल्याचे मोदी म्हणाले.

नामदार (राहुल गांधी) लक्ष्य

2014 मध्ये मोदीच्या खात्यात पडलेल्या मतांमुळेच देश आज वेगाने विकास करतोय. जनतेचे मत देश आणि छत्तीसगडला नव्या शिखरावर नेणार आहे. भाजपच्या लाटेमुळे काँग्रेस पक्ष गोंधळला असून मोदी नाव असणाऱया प्रत्येक व्यक्तीला चोर ठरवत आहे. काँग्रेसच्या नेत्याने टाळय़ा मिळविण्यासाठी संपूर्ण समाजालाच चोर ठरविले आहे. नामदाराने आज मोदीला शिवी दिली आहे. उद्या तो आदिवासींना शिव्या वाहू शकतो. काँग्रेसच्या घराणेशाहीला आव्हान देणाऱयाला शिव्या दिल्या जात असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

नव्या भारतासाठी निवडणूक

2019 ची निवडणूक ही केवळ पक्ष, खासदार आणि सरकार निवडून आणण्यापुरती मर्यादित नाही. नवा भारत निर्माण करणारी ही निवडणूक आहे. बदलत्या जगात भारताचे स्थान आणि त्याची प्रतिष्ठा ठरविणारी ही निवडणूक आहे. सद्यकाळात पाकिस्तानात घुसून भारत सर्जिकल स्ट्राइक करतो. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून ठार करण्याची हिंमत भारताने दाखविल्याचे मोदी म्हणाले.

नामदार जामिनावर

नामदाराच्या परिवाराचे बहुतांश सदस्य जामिनावर आहेत. त्यांनी निवडलेला मुख्यमंत्रीही जामिनावरच सुटला आहे. नामदारांवर कोटय़वधी रुपयांच्या करचोरीचा खटला सुरू आहे. हेलिकॉप्टर घोटाळा तर काही वर्षांपूर्वीचा असून त्याची गुपिते माहिती असणाऱयाला विदेशात पकडून भारतात आणले असून तो तुरुंगात कैद आहे. मिशेल मामा नवनवी गुपिते उघड करतोय. मामाने तोंड उघडण्यास प्रारंभ केल्याने भाचा आणि मॅडमची धडधड वाढल्याचे म्हणत मोदींनी गांधी परिवाराला लक्ष्य केले.

ओडिशातील सभा संबोधित

पंतप्रधान मोदी यांनी ओडिशातील संबलपूर येथेही सभेला संबोधित केले आहे. केवळ मलई खाण्यास प्राधान्य देणाऱयांना जनतेची चिंता काय असणार? चिटफंड आणि खाणमाफियांना राज्य सरकारनेच संरक्षण दिल्यास सामान्यांचे अश्रू कोण पुसणार? कोळसा घोटाळय़ात कोण सामील आहेत हे ओडिशाचे लोक जाणत असल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

 

Related posts: