|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दक्षिण गोव्यात 810 मतदान केंद्रे

दक्षिण गोव्यात 810 मतदान केंद्रे 

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात एकूण 810 मतदान केंद्रे असून ही सर्व केंद्रे मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाल्याची माहिती दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी अजित रॉय यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मतदानासाठी येणाऱया विशेष मतदारांची सर्व ती काळजी घेतली जाईल. त्यांना कोणतीच अडचण भासू दिली जाणार नाही अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दक्षिण गोव्यात 288 मतदार असे आहेत, त्यांना दृष्टीची समस्या आहेत. अशा मतदारांना राज्य निवडणूक आयोगाने विशेष तरतूद केली आहे. त्यांच्यासाठी मतदार कार्ड वेगळे असून त्यांना सर्व सहाय्य मतदान केंद्रावर केले जाणार आहे. तसेच 3263 मतदार अपंगत्व असलेले आहेत. या सर्व मतदारांची यादी निर्वाचन अधिकाऱयांकडे असून त्यांच्यासाठी व्हिल चेअर तसेच मदतनीस देखील मतदान केंद्रावर उपलब्ध असतील. शिवाय मतदान केंद्रावर डय़ुटी बजावणारे पोलीस त्यांना सहाय्य करतील अशी माहिती देण्यात आली.

सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदारांसाठी व्हील चेअर, रॅम्प व्यवस्था तसेच दोन सहाय्यक असतील अशी माहिती निर्वाचन अधिकारी अजित रॉय यांनी दिली. विशेष मतदारांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती तहा हसिफ यांनी दिली.

जे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत, त्यांच्यासाठी टपाल मतदानांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर सर्विस मतदार म्हणजे सैनिक तसेच विदेश सेवेत असलेल्यांना देखील टपाल मतदानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बोर्डा-मडगाव येथील सरकारी महाविद्यालयात मतपेटय़ा (इलेक्ट्रोनिक मशिन्स) ठेवण्याची खास व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला अतिरीक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक उपस्थित होते.