|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सागरी सीमेवर अतिदक्षतेचा इशारा

सागरी सीमेवर अतिदक्षतेचा इशारा 

श्रीलंकेतील आत्मघाती स्फोटांची पार्श्वभूमी : दहशतवाद्यांचे पलायन रोखण्याचा हेतू

वृत्तसंस्था/  चेन्नई 

 श्रीलंकेला लागून असलेल्या सागरी सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाने सोमवारी दिली आहे. श्रीलंकेतील आत्मघाती हल्ल्याचा कट रचणाऱयांना तसेच अन्य दहशतवाद्यांना फरार होण्यापासून रोखण्यासाठी नौका आणि टेहळणी विमाने तैनात करण्यात आली आहेत.

श्रीलंकेतील स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारतातही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतीय तटरक्षक दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सीमेला लागून असलेल्या शहरांमधील दक्षता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलंबोमध्ये स्फोटाचा कट रचणारे दहशतवादी भारतीय सागरी सीमेचा वापर करू शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या इशाऱयानंतर तटरक्षक दलाने सागरी सीमेवर डॉर्नियर विमान तैनात केले आहे. सागरी किनारा लाभलेल्या सर्व राज्यांना विशेष खबरदारी घेण्याचा निर्देश देण्यात आला आहे. नौदलाच्या तळांवरील सुरक्षा तसेच सागरी टेहळणी कार्य वाढविण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. श्रीलंकेतील आत्मघाती हल्ल्यांचे स्वरुप 26/11 च्या हल्ल्यांशी मिळतेजुळते असल्याने यात पाकिस्तानी दहशतवादी म्होरक्यांचा हात असू शकतो. तुतिकोरिन, मंदापाम आणि कराईकल या तटरक्षक दलाच्या तळांवरील टेहळणी सेवा वाढविण्यात आली आहे. तर केरळच्या कोची येथील नौदलाच्या तळावर विशेष सतर्कता बाळगली जात आहे.