|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » सचिनचे मुंबई इंडियन्सला विनाशुल्क मार्गदर्शन

सचिनचे मुंबई इंडियन्सला विनाशुल्क मार्गदर्शन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला आपण कोणतेही मानधन न घेताना विनाशुल्क मार्गदर्शन करत असल्याचे लेखी पत्र भारताचा माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकरने लोकपालना पाठविले आहे. यापूर्वी लोकपालतर्फे सचिनला नोटीस पाठविण्यात आली होती.

मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी लोकपालकडे सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याविरूद्ध लेखी तक्रार केली होती. आयपीएलमध्ये सचिन आणि लक्ष्मण हे दुहेरी भूमिका वठवत असल्याचे नमूद केले. दरम्यान नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला अशी दुहेरी भूमिका करता येत नसल्याचे म्हटले आहे. या दुहेरी भूमिकेतून त्यांना मानधनही मिळते, अशी तक्रार संजीव गुप्ता यांनी केली. दरम्यान निवृत्त न्यायाधीश तसेच लोकपाल डी.के. जैन यांनी सचिनला गुप्ता यांच्या तक्रारीवरून नोटीस पाठविली. सचिनने या नोटीसीला 14  महत्त्वाच्या कलमासह लेखी उत्तर दिले आहे.

आपण मुंबई इंडियन्स संघाचा चाहता असून या संघाच्या फ्रांचायजीच्या सांगण्यानुसार संघाला मार्गदर्शन करत आहे. पण मार्गदर्शन करताना त्याचा आर्थिक मोबदला आपण घेत नसल्याचे स्पष्टीकरण सचिनने केले आहे. फ्रांचायजी आणि क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांच्या सांगण्यावरून आपण ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे सचिनने म्हटले आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर सचिनने या क्षेत्रामध्ये प्रशिक्षक तसेच इतर कोणत्याही पदासाठी प्रयत्न केलेला नाही. मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक वर्गामध्ये सचिन कोणतेही पद भूषवित नसून खेळाडूंच्या निवडीबाबतही त्याचा हस्तक्षेप नसल्याचे फ्रांचायजीनी म्हटले आहे. 2015 साली सचिनची भारतीय क्रिकेट मंडळाच्या सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी सचिनचा मुंबई इंडियन्स संघात सहभाग होता.

या प्रकरणी भारतीय क्रिकेट मंडळासमोर सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांना सुनावणीसाठी जाण्याची जरूरी नाही, असे आयपीएल स्पर्धा आयोजकांनी सांगितले आहे. सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सचा तर लक्ष्मणला हैद्राबाद सनरायजर्सचा मेंटर म्हणून ओळखले जातात.