|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘यमन’, ‘भूप’ आणि ‘केदार’रागातील बंदिशींनी कानसेन तृप्त

‘यमन’, ‘भूप’ आणि ‘केदार’रागातील बंदिशींनी कानसेन तृप्त 

 

 पुणे / प्रतिनिधी :  शास्त्रीय, सुगम, सीनेसंगीत, गझल गायनातून रसिकांना सुंदरशा ‘यमन’, ‘भूप’ आणि ‘केदार’ अमृतवर्षिणी या रागांची गोडी अनुभवायला मिळाली. रसिकांनी या रागांची ओळख करुन घेतांना कलाकरांसमवेत ‘सरगम’गात कानांबरोबरच मनाची कवाडे खुली करुन रागांच्या गोडीचा ठेवा मनात जपला!

निमित्त होते ते ‘क्लब कानसेन’या योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे. शास्त्रीय संगीताच्या परिभाषा व प्रत्यक्ष संगीत मैफल या दोन्हीचा आनंद घेत शास्त्रीय संगीत एका वेगळय़ा जाणिवेतून समजावून घेण्यासाठी पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व प्रसिद्ध गायक, संगीतकार हेमंत पेंडसे यांनी ‘क्लब कानसेन’ही आगळी वेगळी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

मनहर संगीत सभेच्या या योजनेचा शुभारंभ रविवारी सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंड्ये-साठये तसेच हेमंत पेंडसे, सुयोग कुंडलकर आणि सहकलाकारांच्या सहभागातून झाला. अगदी 10 वर्षाच्या गायक कलाकारापासून सत्तरी ओलांडलेल्या रसिकांची हजेरी हे सुद्धा या कार्यक्रमाचे वैशिष्टय़.

पहिल्या कार्यक्रमात कल्याणकारी ‘यमन’रागाचे अंतरंग प्रात्यक्षिकाद्वारे उलगडून दाखविण्यात आले. सुरुवातीस हेमंत पेंडसे यांनी अभिषेकीबुवांचा ‘यमन’ रागातील ‘तराना’ सादर करुन अर्ध्यामात्रेचा अभ्यास कशापद्धतीने करण्यात येतो या विषयी विवेचन केले. ‘अमृतवर्षिणी’ या अप्रचलित रागातील ‘का संग कीन्ही प्रीत’ ही बंदीश देखिल फार सुंदर प्रस्तुत केली.

‘यमन’रागाने चित्रपट गीतांना कशी श्रीमंती प्राप्त झाली हे सावनी शेंडे, सुयोग कुंडलकर यांनी सोदाहरण स्पष्ट करण्यापूर्वी सावनी यांनी ‘राग’यमनमधील विलंबित एकतालातील ‘ए बरनन कैसे करू मै गुरू के ग्यान’आणि ‘बावरे मत कर गुमान’या दोन बंदिशी सादर केल्या. ‘भूप’मधील ‘सहेलारे’आणि ‘केदार’ रागातील ‘कान्हारे नंद नंदन’या बंदिशी रसिकांच्या पसतींची पावती मिळवून गेल्या. ‘मनरे परसी हरि के चरण’, ‘आईरे सजनिया’, ‘आज जाने की जिद ना करो’, ‘भय इथले संपत नाही’, ‘ये जवळी’, ‘जिया ले गयो’, ‘जब दीप जले आना’ ही गीते रसिकांची दाद मिळवून गेली. ‘मिळे आवडीचे सुख’ या भजनाने मैफलीचा समारोप करण्यात आला. राधिका ताम्हनकर, पार्थ ऊमराणी यांनी मैफलीत सहभाग घेत सुंदर रचना सादर केल्या. सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अभिजित बारटक्के (तबला), तुषार दीक्षित (कि बोर्ड) यांनी साथसंगत केली.