संयुक्त राष्ट्रसंघात भारताला नवे यश

संयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था :
भारताच्या जगजीत पवाडिया यांची संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर (आयएनसीबी) पुन्हा निवड झाली आहे. पवाडिया 2015 पासून आयएनसीबीच्या सदस्या आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ 2020 पर्यंत होता.
निवडणूक निकालाची घोषणा झाल्यावर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड निवडणुकीत भारताच्या जगजीत पवाडिया यांनी पहिले स्थान मिळविले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने मंगळवारी गुप्त मतदानाच्या माध्यमातून पवाडिया यांची निवड केली आहे.
या निवडणुकीत परिषदेच्या एकूण 54 सदस्यांनी भाग घेतला आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 44 मते प्राप्त करून पवाडियांनी पहिल्या क्रमांक पटकाविला आहे. दुसऱया क्रमांकावर राहिलेले मोरक्कोच जलल तौफीक यांना 32 मते प्राप्त झाली. पॅराग्वेचे सीजर रिवास हे 31 मतांसह तिसऱया क्रमांकावर राहिले आहेत. पवाडिया यांचा कार्यकाळ 2025 मध्ये समाप्त होणार आहे.
1954 मध्ये जन्मलेल्या पवाडिया यांनी 1988 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील काळात इंडियन इन्स्टीटय़ूटमधून त्यांनी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले होते. 2015 पासून पवाडिया या आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्या आहेत. भारतीय महसूल सेवेत त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले असून महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. नार्कोटिक्स ड्रग्ज, व्हिएन्नाच्या आयोगात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताच्या सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्समध्ये त्यांनी काम केले आहे.