|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टँकरच्या धडकेत पोलीस हवालदार सुतार जागीच ठार

टँकरच्या धडकेत पोलीस हवालदार सुतार जागीच ठार 

प्रतिनिधी /इस्लामपूर :

इस्लामपूर-वाघवाडी फाटा रस्त्यावरील प्रतिक पेट्रोल पंपासमोर दुधाच्या टँकरने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील कुरळप पोलीस ठाण्यातील हवालदार अजय मारुती सुतार (रा. जामवाडी-सांगली) हे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकर चालकाने पळ काढला असून अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती.

सुतार हे सुझुकी मोटारसायकल नं. एम. एच. 14 एफ. एल. 5569 वरुन इस्लामपूरहून कुरळप पोलीस ठाण्याकडे डयुटीवर चालले होते. त्यांना पोलीस उपाधिक्षक कार्यालयातील टपाल कुरळप पोलीस ठाण्याकडे नेण्याची डयुटी होती. प्रतिक पेट्रोल पंपावर आल्यानंतर शिवपार्वती रोडलाईन्स कंपनीचा दुधाचा टँकर मागून वेगात आला. या टँकरने मोटारसायकलस्वार सुतार यांना ओलांडून अचानक समोर येवून पेट्रोलपंपात टँकर वळवला. दरम्यान सुतार यांना जोराची धडक बसली. त्यामुळे ते मोटारसायकलसह क्लिनर बाजूच्या मागील चाकात सापडले. ही धडक इतकी जोराची होती की, टँकरने सुतार यांना मोटारसायकलसह काही अंतर फरफटत नेले. वेगात असणाऱया टँकरचा चालक शरद शिवाजी चिखले (रा. चिकुर्डे) याला चाकात मोटारसायकल अडकल्याचेही लक्षात आले नाही. आजूबाजूच्या लोकांनी ओरडून सांगितल्यानंतर त्याने टँकरचा ब्रेक दाबून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सुतार यांच्या डोक्यावरुन चाक गेले होते. सुतार यांनी हेल्मेट घातले होते. त्यातूनही हेल्मेट फुटून डोक्याचा व चेहऱयाचा चेंदामेंदा झाला होता. तर मोटारसायकलची पेट्रोल टाकी फुटून पेट्रोल रस्त्यावर सांडले होते. मोटारसायकलचे सुमारे 30 हजारांचे नुकसान झाले आहे.

रहदारीच्या रस्त्यावर हा अपघात झाल्याने काही वेळातच अपघाताची माहिती परिसरात समजली. त्याचबरोबर इस्लामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार भोकरे व गडदे अपघातस्थळी पोहचले. त्यांना सुरुवातीस मृताची ओळख पटली नाही. मात्र या अपघाता दरम्यानच कुरळप पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणारे पोलीस नाईक बाजीराव भोसले व हवलदार संजय पाटील हे डयुटी संपवून इस्लामपूरकडे येत हेते. इस्लामपूर पोलीस मृताची ओळख पटवत असतानाच मोटारसायकल व बॅगावरुन मृत हे अजय सुतार असल्याचे या दोघांनी सांगितले. त्यामुळे कुरळप पोलीस ठाण्यात शोककळा पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशितोष चव्हाण यांनी अपघातस्थळी भेट दिली. सुतार यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. या अपघात प्रकरणी बाजीराव भोसले यांनी वर्दी दिली आहे.

Related posts: