|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जखमी टॅक्सी चालकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद, आरोपीस अटक

जखमी टॅक्सी चालकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा नोंद, आरोपीस अटक 

प्रतिनिधी /वास्को :

मांगोरहिल वास्को भागात झालेल्या भांडणातील जखमी टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आहे. नऊ दिवसांपूर्वी शुल्लक कारणावरून मयत चालकावर जीवघेणा हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याला गोमेकॉमध्ये गुरूवारी सकाळी मृत्यू आला. मयताचे नाव दीपक उर्फ बबन दळवी असे असून संशयीत आरोपी आझीम नबी शेख याला वास्को पोलिसांनी अटक केली आहे.

एक एप्रिलच्या मध्यरात्री मांगोरहिल येथील चोपडेकर बार समोर व्यवसायाने  रीक्षा चालक असलेल्या आझीम नबी शेख(43) व टॅक्सी चालक असलेल्या दीपक दळवी (44) यांनी एकमेकांवर काचेची बाटली व लोखंडी पाईपने वार केले होते. दोघेही या घटनेत जखमी झाल्याने त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आझीम हा किरकोळ जखमी झाल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. तर दीपक दळवी हा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्यावर गोमेकॉत उपचार करण्यात येत होते. मात्र, गुरूवारी त्याला मृत्यू आला. या घटने प्रकरणी त्याच रात्री परस्परांविरूध्द वास्को पोलीस स्थानकात तक्रारी नोंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आझीम याला अटक करून त्याला जामीनावर सोडण्यात आलेले आहे.

आझीम याने केलेल्या जीव घेण्या हल्ल्यात दीपक याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी आझीमविरूध्द खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. त्याला काल संध्याकाळी पुन्हा अटक करण्यात आली. या घटनेच्या प्रत्यक्षदर्क्षीनी दिलेल्या माहितीनुसार दळवी याने आझीमवर लोखंडी पाईपने वार केला होता. तर आझीमने त्याच्यावर काचेच्या बॉटलने शरीरावर अनेक ठिकाणी वार केले होते. मयत व संशयीत दोघेही मांगोरहिल भागातीलच असून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र, त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊन वाद निर्माण झाला व या वादाचे पर्यावसन शेवटी खूनात झाले. या खूनासाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी यापूर्वीच जप्त केलेले आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related posts: