|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मातेच्या मायेला पारखा..राऊळ कुटुंब बनले आसरा

मातेच्या मायेला पारखा..राऊळ कुटुंब बनले आसरा 

जन्मानंतर माकडाच्या पिल्लाची माता मृत

पिल्लाच्या जीवाला होता धोका

कुडाळच्या राऊळ कुटुंबाने दिले मायेचे छत्र

घरातीलच एक बनला सदस्य

वार्ताहर / कुडाळ:

 जन्म दिल्यानंतर अवघ्या काही वेळात माता मृत झाल्याने मातेच्या मायेला पारखे झालेल्या माकडाच्या इवल्याशा पिल्लाला कुडाळ येथील प्राणीमित्र मोहन राऊळ व त्यांच्या कुटुंबाने आसरा दिला. गेले पंधरा दिवस लहान मुलाप्रमाणे त्या पिल्लाचे राऊळ कुटुंबीय संगोपन करीत आहेत. ‘ब्रूट’ असे त्याचे नामकरणही केले असून त्यांच्या हाता-खांद्यावर व बिछान्यावर बागडणाऱया त्या पिल्लाचे ते हक्काचे घर बनले आहे.

 दिवस होता 27 एप्रिल 2019. येथील बॅ. नाथ पै विद्यालय परिसरात माकडांच्या टोळीत आपापसात हल्लाबोल झाला. त्यातील एका मादीने एका पिल्लाला जन्म दिला होता. ते तिला बिलगून होते. या झटापटीमध्ये उडी मारताना पिल्लू फेकले गेले आणि मातेपासून त्याची ताटातूट झाली. नंतर नेमके काही कळले नाही. पण त्या पिल्लाची माता काही अंतरावर मृतावस्थेत आढळली. नुकतेच जन्माला आलेले ते पिल्लू तेथील विद्यालयाच्या खोलीच्या पत्र्यावरून खाली पडल्याचे तेथील एका कर्मचाऱयाने पाहिले. त्या पिल्लाचा जीव वाचावा, यासाठी त्याने कुडाळेश्वरवाडी येथील केदार राऊळ या तरुणाला कल्पना दिली. केदार यांनी प्राणीमित्र मोहन राऊळ यांना फोन करून ही घटना सांगितली. त्यांच्या मुली कविता राऊळ व ईश्वरी राऊळ त्या पिल्लाला पाहण्यासाठी गेल्या. त्याला पाहून त्या दोघींचे मन गहिवरले आणि पिल्लाला घेऊन घरी आल्या.

 त्या पिल्लाला व्यवस्थित स्वच्छ केले. भूकेने व्याकूळ झालेल्या त्या पिल्लाला दूध दिले. नंतर नेरुर वन विभागाकडे त्याला देण्याचा निर्णय झाला. वन कर्मचारी त्याला घेऊन गेले. पण राऊळ यांनी वन विभागाच्या कार्यालयात जात ‘आम्ही त्या पिल्लाचा सांभाळ करतो’, असे सांगून पुन्हा त्याला आपल्या घरी घेऊन आले.

 त्या पिल्लाचे ‘ब्रूट’ असे नामकरण केले. त्याला टय़ूबने दूध पाजण्यात येते. ब्रूटची लहान मुलाप्रमाणे काळजी घेतली जात आहे. तो त्यांच्या अंगा-खांद्यावर बागडतोय. गेले पंधरा दिवस त्याचे व्यवस्थित संगोपन राऊळ कुटुंब करीत असून तो आता त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखा वावरताना दिसतो. आता तो चांगला ‘प्रेश’ही झाला आहे.

 ब्रूट काहीसा सुदृढ झाल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी पाठविणार आहोत. याबाबत आपण गोवा येथील डॉ. चावला यांच्याशी बोललो आहे, असे मोहन राऊळ यांनी सांगितले. मूळ परुळे येथील राऊळ कुटुंब गेली अनेक वर्षे कुडाळला वास्तव्यास आहेत. पशु-पक्षी, प्राण्यांवर राऊळ कुटुंब अपार प्रेम करते. पीडित पशुöपक्षी, प्राणी आढळला, तर त्याला रक्षणासाठी घरी आणतात. त्याच्यावर उपचार करून योग्य काळजी घेत नंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडतात. प्राण्यांचे संरक्षण व संगोपन करून एकप्रकारे सेवा करीत आहेत. ही सेवा करण्यात समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले.