|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मोती तलावातील पाण्याची पातळी घटली

मोती तलावातील पाण्याची पातळी घटली 

गाळ साचल्याने स्थिती-नगराध्यक्ष

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडी मोती तलावाचे पाणी मेच्या पहिल्या आठवडय़ातच कमी झाले आहे. प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तलावाचे पाणी सोडण्यात आल्याची चर्चा होती. परंतु पालिकेने पाणी सोडले नसून पातळीच कमी झाल्याचे स्पष्ट केले. तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तलावात गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी कमी झाले. गाळ काढण्यात येणार आहे. परंतु गाळ काढण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याचे सांगितले. दरम्यान, भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तळय़ाचे आटलेले पाणी हे त्याचे द्योतक असल्याचे येथे झालेल्या पाणी परिषदेत अलिकडेच नमूद करण्यात आले होते.

सावंतवाडी मोती तलाव संस्थानकालीन आहे. तो नेहमी भरलेला असतो. दीपक केसरकर नगराध्यक्ष असतांना गाळ काढण्यासाठी तलावाचे पाणी सोडण्यात आले होते. तलावात क्रिकेट स्पर्धाही भरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बबन साळगावकर यांच्या काळात तलावात मगरी असल्याने पाणी कमी करण्यात आले होते. तलावात मगरीचे पिल्लू आढळले होते. त्यानंतर तलावाचे पाणी आटविण्यात आले नाही.

यंदा नगरपालिकेने तलावाचे पाणी सोडले नाही. तरीही पाण्याची पातळी घटली आहे. प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीव्र उन्हाळय़ामुळे पाणी कमी झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तर गाळामुळे पाणी कमी झाले आहे. गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.