|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » झोपडपट्टीमुळे बायपासवर दुर्गंधी

झोपडपट्टीमुळे बायपासवर दुर्गंधी 

नोटिसा पाठविणार : दक्षता समिती बैठकीत निर्णय

प्रतिनिधी / बांदा:

 झाराप-पत्रादेवी बायपासवर बांदा कट्टा कॉर्नर परिसरात स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने परप्रांतियांकडून केल्या जाणाऱया घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. सदर प्रकार थांबविण्यासाठी झोपडी मालकांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय शांतता व दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पावसाळय़ात दरवषी उद्भवणाऱया वीज समस्यांकडे वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी पत्र देण्याचा निर्णयही घेण्यात आला. पावसाळय़ातील आपत्ती व्यवस्थापनावरही सभेत चर्चा झाली.

बांदा पोलीस ठाण्यात शांतता व दक्षता आणि मोहल्ला समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव, सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच अक्रम खान, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रा. पं. सदस्य जावेद खतिब, ज्ये÷ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, गणेश गर्दे, संदीप बांदेकर, साईप्रसाद कल्याणकर,
प्रशांत पांगम, बंडय़ा खान, डॅनी आल्मेडा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, कॉन्स्टेबल मनिष शिंदे आदी उपस्थित होते.

कट्टा कॉर्नर परिसरात बायपासनजीक झोपडपट्टीतील परप्रांतीय मजुरांकडून स्वच्छतागृहाअभावी घाण केली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मजुरांसाठी झोपडी मालकांनी स्वच्छतागृहाची निर्मिती करणे बंधनकारक असून तशी नोटीस देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस ठाण्यात झोपडी मालक व ग्रामपंचायत प्रशासन यांची एकत्रित बैठक घेऊन तोडगा न निघाल्यास कारवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिले.

फायबर बोटीची मागणी

पावसाळय़ात आळवाडा भागात पुराचे पाणी घुसते. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायबर बोटीची गरज आहे. सावंतवाडी तहसीलदारांकडे तशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. झाडांच्या फांद्या मोडून वीजपुरवठा गायब होण्याचे प्रकार सर्रास होतात. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीला पत्राद्वारे कळविण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बांदा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल बंडगर व मनिष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.