|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अवैध दारू वाहतूकप्रकरणी चंदगडच्या तरुणावर कारवाई

अवैध दारू वाहतूकप्रकरणी चंदगडच्या तरुणावर कारवाई 

  • उत्पादन शुल्कच्या ओरोस भरारी पथकाची कामगिरी

  • तीन लाखाची दारू आणि दोन लाखाची सुमो जप्त

  • चालक नामदेव सावंत ताब्यात

प्रतिनिधी / ओरोस:

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भरारी पथकाने कोल्हापूरकडे जाणारी गोवा बनावटीची तीन लाखाची अवैध दारू जप्त केली असून सुमोचालक नामदेव भिमाना सावंत (48, रा. चंदगडकोल्हापूर) याच्यावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे.

सावंतवाडीबेळगाव मार्गावरून गोवा बनावटीच्या विनापरवाना दारुची वाहतूक कोल्हापूरच्या दिशेने होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस येथील भराती पथकाला मिळाली होती. अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात, दिवाकर वायदंडे, जवान रमाकांत ठाकुर, शिवशंकर मुपडे, मानस पवार, दीपक वायदंडे यांनी दाणोली येथे सापळा रचला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे जाणाऱया पांढऱया रंगाच्या सुमो गाडीला (एमएच-43/एल– 0842) तपासणीसाठी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने न थांबता पोबारा केला. त्यामुळे पाठलाग करून काही अंतरावरच वाहन अडविण्यात आले.

तपासणीदरम्यान या गाडीत तीन लाख रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळली. त्यामुळे दारू जप्त करण्यात आली. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे दोन लाख रुपये किमतीची सुमो गाडीही जप्त करण्यात आली. एकूण पाच लाखांच्या मुद्देमालासह चालकावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. अधिक तपास प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत करत आहेत.