|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हासन यांचे वादग्रस्त विधान

हासन यांचे वादग्रस्त विधान 

गोडसेला ठरविले पहिला हिंदू दहशतवादी

वृत्तसंस्था/ चेन्नई 

महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असं विधान मक्कल निधी मय्यम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तामिळनाडूतील अरिवाकुरुची विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हासन यांनी हे विधान केले आहे. गोडसे हा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता आणि तो हिंदू होता. इथं मुस्लिमांची संख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधींच्या पुतळय़ाखाली उभा असल्याने हे बोलत असल्याचा दावा हासन यांनी केला आहे.

गांधींची हत्या झाली होती आणि त्याचा न्याय मागण्यासाठी इथे आलो आहे. मी सच्चा भारतीय असून देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी हे कोणत्याही भारतीयाला वाटते. माझाही तोच प्रयत्न असून तिरंगा ध्वजच भारताचा राष्ट्रीय ध्वज राहिला पाहिजे असे उद्गार हासन यांनी काढले आहेत.

भाजपकडून टीका

हासन यांच्या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. गांधी यांची हत्या आणि हिंदू दहशतवादाचे प्रकरण आता उपस्थित करणे निंदनीय आहे. पोटनिवडणुकीपूर्वी अल्पसंख्याकांची मते प्राप्त करण्यासाठी ही बाब उपस्थित करून हासन हे आगीशी खेळत आहेत. त्यांनी श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांबद्दल कोणतेच विधान केले नसल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्षा तमिळसाई सुंदरराजन यांनी केली आहे.