|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नवाष्म युगीन कातळशिल्पाला बाधा पोहोचवण्याचा प्रकार

नवाष्म युगीन कातळशिल्पाला बाधा पोहोचवण्याचा प्रकार 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये आढळून आलेल्या कातळशिल्प खजिन्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. जगातील एकमेव असलेले इ.स.पूर्व 9 हजार वर्षांपूर्वीच्या नवाष्म युगातील निवळी जयगड मार्गावरील कातळशिल्पाला बाधा पोहोचवण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. पुरातत्व विभागाने या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय इतिहास पुरातत्व संस्कृती विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता राणे कोठारे यांनी केली आहे.

  मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे कातळावर हे शिल्प आजही अस्तित्वात आहे. नवाष्म युगातील हे कातळशिल्प असल्याचे सांगण्यात येते. हे कातळशिल्प म्हणजे एक नकाशा आहे. अपरांत (कोकण) ते दख्खन प्रांतचा व्यापारी मार्ग यातून दर्शवण्यात आल्याचे डॉ. अनिता कोठारे यांनी सांगितले. हे असं कातळशिल्प जगातील एकमेव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कातळशिल्प हा जागतिक दर्जाचा ठेवा आहे. त्यामुळे त्याचे संरक्षण केलेच पाहिजे. मात्र हीच कातळशिल्प आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

  दुर्लक्षित अशा कातळशिल्पांवर अलिकडच्या काळात मानवी अतिक्रमण होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्या कातळशिल्पाचे जतन, संवर्धन करण्याची गरज आहे. रत्नागिरीमधील निवळी-जयगड मार्गावर असणाऱया कातळशिल्पावर अज्ञात व्यक्तीने सिमेंट काँक्रीट मिक्स करून बाजूच्या बांधकामाला वापरण्यात आल्याचं सामोरे आले आहे. कातळशिल्पाच्या अभ्यासिका आणि मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय इतिहास पुरातत्व संस्कृती विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता राणे कोठारे यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी आपणच या कातळशिल्पाचा शोध लावल्याचा दावा अनिता कोठारे यांनी केला आहे.

  हे कातळशिल्प म्हणजे एक नकाशा असून अपरांत(कोकण) ते दख्खन प्रांतचा व्यापारी मार्ग यातून दर्शवण्यात आला आहे. सध्या कोठारे या कोकण दौऱयावर  आहेत. या कातळशिल्पाची अशी दुरवस्था झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्याबाबत खंत व्यक्त केली. मात्र सरकारी अनास्थेमुळे या कातळशिल्पाची सध्या दुरवस्था झाली असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितले. आज शासनस्तरावर येथील कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण अजूनही त्या प्रस्तावाच्या मंजूरीसाठी शासनस्तरावरून दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. शासनस्तरावरून या कातळशिल्पांची दखल न घेतल्यास त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न भविष्यात उभा राहील असे तज्ञांतून बोलले जात आहे.