|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कॅ. देशमुख ऍकॅडमी अव्वल क्रीडांगणामध्ये गणली जाईल

कॅ. देशमुख ऍकॅडमी अव्वल क्रीडांगणामध्ये गणली जाईल 

प्रतिनिधी/ नागठाणे

अपशिंगे (मि.) सैनिकी परंपरा असणाऱया गावात दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी गणेश देशमुख यांनी उभारलेले कॅ. शंकरराव देशमुख स्पॉर्ट्स ऍकॅडमी दर्जेदार असून याच्या माध्यमातून भावी खेळाडू निर्माण होतील आणि हे क्रीडांगण देशातील दहा अव्वल क्रीडांगणामध्ये गणले जाईल, असे उद्गार भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी काढले.

 अपशिंगे (मि.) ता. सातारा येथील सी.एस.डी. एस. क्रीडा संकुलाच्या प्रांगणात क्रिकेट प्रशिक्षक हेमू दळवी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी कर्णधार वेंगसरकर पुढे म्हणाले, देशमुख कुटुंबीयांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहे. आज ग्रामीण भागात अत्याधुनिक असे क्रिकेट स्टेडियम व स्पॉर्ट्स ऍकॅडमी त्यांनी निर्माण केली आहे. या ऍकॅडमीतून ग्रामीण भागातूनही दर्जेदार खेळाडू त्यांनी तयार करावेत, असेही वेंगसरकर यांनी सांगितले.

 यावेळी उद्योजक गणेश देशमुख म्हणाले, 23 वर्ष अविरत काम करून आज आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचलो आहे. वडील कॅ. शंकरराव देशमुख यांनी स्वत:च्या इच्छा-आकांक्षाना तिलांजली देऊन आम्हा भावंडांना उच्च शिक्षण दिले. आज त्यांचे स्वप्न या ऍकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण करताना आनंद होत आहे. याप्रसंगी प्रास्ताविकात उद्योजक संजय देशमुख यांनी, देशमुख ऍग्रो ऍण्ड डेअरी फार्म, ऊर्जा हॉस्पिटॅलिटी व माय क्राफ्ट संस्थेच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक हेमू दळवी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमास महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुरेंद्र भावे, रवी सावंत, माजी रणजीपटू राजू शिर्के, रवी ठक्कर, मृदुल चतुर्वेदी, मुंबई क्रिकेट संघटनेचे श्रीकांत तिगडी, कॅ. शंकरराव देशमुख, क्रीडा पत्रकार विनायक दळवी, विजय बने, लीलाधर चव्हाण, बोरगावचे सपोनि संतोष चौधरी, सोमनाथ देशमुख, ऊर्जा हॉस्पिटेलिटी, माय क्राफ्ट संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा पत्रकार रणजित दळवी यांनी केले, तर प्रभाकर देशमुख यांनी आभार मानले.