|Sunday, October 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » यंदा मान्सून अंदमानात वेळेतच

यंदा मान्सून अंदमानात वेळेतच 

प्रतिनिधी/ पुणे

उकाडय़ाने हैराण झालेले नागरिक तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी चांगली बातमी असून, यंदा मान्सून अंदमानात 22 मे, तर केरळात 4 जूनच्या आसपास धडकेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी वर्तवला. दरम्यान, मान्सूनची सुरुवात फारशी दिलासादायक नसल्याचे भाकितही या संस्थेने वर्तविले आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्राच्या काही भागात कमी पावसाची शक्यताही ‘स्कायमेट’ने वर्तविली आहे.

या संस्थेने मंगळवारी आपला दुसरा विभागवार दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. सर्वसाधारणपणे 20 मे च्या आसपास मान्सून अंदमानात, तर केरळात 1 जूनच्या आसपास दाखल होतो. त्यानंतर त्याचा भारतातील प्रवास सुरू होतो. यावषी देशातील मान्सून अल निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही ‘स्कायमेट’ने व्यक्त केले आहे. तसेच जुलैतही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्मयता आहे.

जून ते सप्टेंबर या महिन्यांत 887 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असून, या अंदाजापैकी 5 टक्के कमी पाऊसही कोसळू शकतो. तसेच जूनमध्ये महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाची शक्मयता कमीच आहे. जुलैच्या दुसऱया आठवडय़ात महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे.

 पूर्वोत्तर भारतात 92 टक्के

मान्सूनच्या पावसात पूर्वेकडील आणि पूर्वोत्तर भारताचा सर्वाधिक 38 टक्के वाटा असतो. भौगोलिक बाबतीत म्हणायचे तर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालसाठी धोका जास्त आहे, तर उत्तरपूर्व भारतासाठी तुलनेने कमी आहे. या हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजे 92 टक्के पावसाची शक्मयता आहे.

या विभागावर सक्रिय मान्सूनचा कालावधी इतर विभागांच्या तुलनेने कमी असतो. हा विभाग देशाच्या एकूण पावसाच्या 17 टक्के योगदान देतो. या विभागात  सरासरीच्या तुलनेत 96 टक्के म्हणजेच समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा आहे. पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआरच्या तुलनेत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ प्रदेशांमध्ये पावसाची स्थिती चांगली राहील.  

 मध्य भारतात सरासरीच्या 95 टक्के पावसाची शक्यता

मध्य भारतात 976 मिमी पावसासह या विभागाचा वाटा 26 टक्के आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पावसाळी हंगाम या विभागात राहण्याची शक्मयता असून, सरासरीच्या 91 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. ओडिशा आणि छत्तीसगढ चांगल्या पावसाची शक्मयता आहे, तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तुलनेने कमी पाऊस असेल. या भागात 20 टक्के दुष्काळाची शक्यता वर्तवली आहे.

 दक्षिण द्वीपकल्पावर सरासरीच्या 95 टक्के पावसाची शक्यता

दक्षिण द्वीपकल्पात या हंगामात कमी धोका असून, सरासरीच्या आसपास 95 टक्के पावसाचा अंदाज आहे. या विभागाचा एकूण पावसाच्या 19 टक्के वाटा असून, सर्वसाधारणपणे पावसाचे प्रमाण 716 मिमी इतके असते. उत्तर-कर्नाटक आणि रायलसीमामध्ये कमी पाऊस होण्याची शक्मयता असून, केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

 महाराष्ट्रातही उशिरा?

4 जूनच्या आसपास मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात येतो. पण, यंदा मान्सूनची सुरुवात संथ राहणार असल्याचे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. त्यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रात उशिरा आगमन होईल, अशी शंका व्यक्त केली जात आहे.