|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उद्योग खात्री योजनेमुळेच शेती संकटात

उद्योग खात्री योजनेमुळेच शेती संकटात 

मजूर उपलब्ध करून देण्याची शेतकऱयांची मागणी : जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

उद्योग खात्री योजनेमधून जी कामे केली जात आहेत, ती कुचकामी ठरू लागली आहेत. या योजनेंतर्गत मजुरांना कामेच द्यायची असतील तर त्या मजुरांनाच शेतकऱयांच्या शेतामध्ये काम करण्यास मुभा द्यावी. अन्यथा, उद्योग खात्री योजनेमुळे शेतीच मोठय़ा संकटात सापडणार हे निश्चित आहे. कारण उद्योग खात्री योजनेमध्ये देण्यात येणाऱया मजुरीमुळे शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूरच मिळेनासे झाले आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून सरकारने उद्योग खात्री योजनेंतर्गत काम करणाऱया मजुरांना शेतीमध्येही काम करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतीमध्ये काम करणाऱया मजुराला 120 ते 150 रुपयांपर्यंत मजुरी दिली जाते. पण उद्योग खात्री योजनेमध्ये 240 रुपये देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतामध्ये काम करण्यास मजूरच मिळेनासे झाले आहेत. उद्योग खात्री योजनेमध्ये नेमकी कोणती कामे केली जातात, त्याचा परिसरासाठी आणि देशासाठी काय उपयोग याचाही विचार होणे गरजेचे आहे. केवळ काम द्यायचे म्हणून नको तिथे खोदाई करायची आणि सर्वसामान्य जनतेचे पैसे खर्च करायचे हे कितपत योग्य आहे? याचाही कोठेतरी विचार होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱयांनी व्यक्त केले आहे. या योजनेमध्ये काम करणाऱया मजुरांना सरकारने मजुरी द्यावी, पण त्यांना शेतीमध्ये काम करण्यास सांगावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

उद्योग खात्री योजनेमध्ये काम करण्यासाठी अनेक महिला मजुरांची पहाटेपासूनच धावपळ सुरू असते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाकडेही त्यांचे दुर्लक्ष होत आहे. केवळ पैसा मिळतो म्हणून जायचे पण यामध्ये सरकारचे मोठे नुकसान होत आहे. खरोखरच जर एखाद्या समाजोपयोगी किंवा जनतेच्या हितासाठी काम होत असेल तर त्याचा निश्चित फायदा होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

उद्योग खात्रीमध्ये जी मजुरी दिली जाते ती शेतात काम करण्यास येणाऱया मजुरास देणे शेतकऱयाला अशक्मय आहे. कारण शेत मालाचे भाव पाहता शेतकऱयाला शेतीच नको म्हणण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस शेतीच धोक्मयात येणार हे निश्चित आहे. तेव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे आप्पासाहेब देसाई, सोमनाथ मायाण्णा, आप्पय्या देसाई, निंगाप्पा मायाण्णा, आप्पय्या पवार, केदारी मायाण्णा, सुभाष धायगोंडे, रामचंद फडके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.