|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनने रोखला 90 पाकिस्तानी वधूंचा व्हिसा

चीनने रोखला 90 पाकिस्तानी वधूंचा व्हिसा 

पाक युवतींची तस्करी होत असल्याचा संशय : दोन्ही देशांकडून होतेय चौकशी

बीजिंग  :

 बनावट विवाह करून पाकिस्तानी युवतींना तस्करीद्वारे चीनमध्ये नेण्यात येत असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या दूतावासाने 90 पाकिस्तानी वधूंच्या व्हिसाला स्थगिती दिली आहे. पाकिस्तानातील चीनचे ‘डेप्युटी चीफ ऑफ मिशन’ लिजियान झाओ यांनी या कारवाईची माहिती दिली आहे. स्वतःच्या पाकिस्तानी वधूंसाठी व्हिसा इच्छिणाऱया 140 चिनी नागरिकांचे अर्ज मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

व्हिसाचे 50 अर्ज मंजूर करण्यात आले असून उर्वरित अर्जांना मान्यता देण्यात आलेली नाही. दूतावासाला 2018 मध्ये असे 142 अर्ज प्राप्त झाल्याचे झाओ यांनी म्हटले आहे. विवाहाच्या नावाखाली फसवणूक करून पाकिस्तानी युवतींची चीनमध्ये तस्करी करणाऱया टोळय़ांच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश पाक सरकारने तपास यंत्रणांना दिला आहे.

 पाकिस्तानात कार्यरत किंवा तेथील दौऱयावर आलेल्या चिनी पुरुषांशी विवाह करण्यासाठी ख्रिश्चन समुदायातील गरीब युवतींना मोठी रक्कम तसेच चांगल्या जीवनाचे आमिष दाखविले जाते. बहुतांश युवती मानवी तस्करीच्या बळी ठरल्या आहेत किंवा देहव्यापारात ढकलल्या गेल्या आहेत.

दोन्ही देशांच्या नागरिकांदरम्यान होणाऱया विवाहांच्या संख्येतील अचानक वृद्धी पाहता अधिकारी सतर्क झाले आहेत. पाकिस्तानी राजदूतांशी संपर्क साधला असून त्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. चीनमध्ये पाकिस्तानी महिलांचे त्यांच्या पतींकडून शोषण होत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्याचे झाओ यांनी सांगितले आहे.