|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पश्चिम बंगालमध्ये ‘रण’

पश्चिम बंगालमध्ये ‘रण’ 

मुदतीपूर्वीच प्रचाराला ब्रेक : मुख्य सचिवांची उचलबांगडी : निवडणूक आयोगाचा बडगा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यादरम्यान सुरू झालेल्या दोन्ही पक्षांमधील राजकीय राडेबाजीमुळे निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारत बुधवारी रात्री मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मुख्य सचिवांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. तसेच शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा कालावधी संपण्यापूर्वीच जाहीर प्रचाराला बंदी घातली आहे. जाहीर सभा, रोड शो आणि रॅलींवर बंदी घातली. तसेच जाहीर प्रचार एक दिवस अगोदरच म्हणजे गुरुवारी रात्री 10 वाजताच बंद करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या कडक पवित्र्यामुळे यंदाच्या निवडणुकीला गालबोट लागले.

कोलकाता येथे आयोजित भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या ‘रोड शो’वेळी झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद बुधवारी कोलकाता व दिल्लीत उमटले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर तीनवेळा हल्ल्याचा प्रयत्न केला, ‘सीआरपीएफ’च्या जवानांमुळेच मी बचावलो. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिली. तर अमित शहा देव आहेत काय?, असा प्रश्न करत त्यांच्याविरोधात आंदोलन होणारच. मंगळवारच्या रोड शोवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केला. एकूणच बुधवारी दिवसभर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील शाब्दिक हिंसा सुरूच राहिली.

  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मंगळवारी कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या तुफान दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांसह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी जखमी झाले होते. पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

भाजपकडूनच दगडफेक : तृणमूल काँग्रेस

अमित शहा यांनी आपल्या रोड शोमध्ये परराज्यातील गुंड आणले होते. विद्यार्थ्यांनी त्यांना केवळ काळे झेंडे व फलक दाखवले. यावेळी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केवळ प्रसिद्धी आणि विरोधी पक्षाच्या बदनामीसाठी दगडफेक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार ओ ब्रायन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ दाखवला. यासंदर्भातील पुरावे आम्ही निवडणूक आयोगाला सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तृणमूलकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न : शहा

लोकसभा निवडणूक काळात केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्यावर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसाचार करत आहेत. मंगळवारच्या रोड शोमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर तीनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानामुळेच (सीआरपीएफ) मी बचावलो, असा दावा बुधवारी दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी केला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच कोलकाता विद्यापीठामधील ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती तोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांचे फलक फाडले, रोड शोवर दगडफेक करत जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, केवळ राजकीय स्वार्थासाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अशा प्रकारांना आम्ही घाबरत नाही. तृणमूलकडून सुरू असणाऱया हिंसाचाराला भाजप जुमानत नाही, असेही त्यांनी ठणकावले.

ममता बॅनर्जी यांच्या प्रचारावर बंदी घाला : भाजप

निवडणुकीत पराभव दिसत असल्याने ममता बॅनर्जी वैफल्यग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील प्रचारावर बंदी घालावी, अशी मागणी अमित शहा यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच हिंसाचार : ममता बॅनर्जी

भाजपच्या कार्यकर्ते संस्कारहीन असल्यामुळेच त्यांनी समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती तोडली. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना कोलकाता विद्यापीठाची महान परंपरा माहीत आहे का, त्या कृत्याबद्दल भाजपला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. दरम्यान, तृणमूलच्या सर्व नेत्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलर आणि व्हॉटस्ऍप डीपीवर महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा फोटो लावत भाजपचा निषेध नोंदवला. 

मोर्चा… तक्रार.. आणि जंतर-मंतरवर मूकविरोध

 कोलकातामध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद दिल्लीमध्येही उमटले. ममता बॅनर्जी यांनी बेलाघाटपासून मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. विद्यासागर महाविद्यालयातील विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तर कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात निषेध मोर्चा काढला. दरम्यान, भाजपने दिल्लीतील तृणमूलच्या विरोधात जंतर-मंतर येथे मूकविरोध आंदोलन सुरू केले. यामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, हर्षवर्धन, विजय गोयल यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला.

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई…

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार मुदतीआधीच समाप्त करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने प्रथमच ‘कलम 324’ अंतर्गत आपल्या अधिकारात हा निर्णय घेतला आहे. तसेच निवडणूक आयोगाने कारवाईचा दणका देत पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि गृह विभागाचे मुख्य सचिव अत्री भट्टाचार्य यांना पदावरून हटवले आहे. तसेच दोघांनाही गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

‘कलम 324’ नुसार बडगा…

निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात म्हणून स्वत:च्या अधिकारात आयोगाला निर्णय घेण्याची मुभा कलम 324 नुसार मिळालेली आहे. याअंतर्गत प्रशासनातील तैनात अधिकारी, प्रचार कालावधी निश्चिती आणि प्रचाराचे नियम यावर स्थितीनुसार निर्णय घेतला जाऊ शकतो. ‘कलम 324’ हे निवडणूक आयोगासाठी मोठे आयुध मानले जाते. आयोगाच्या म्हणण्यानुसार हे कलम प्रथमच लागू करण्यात आले असून प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाल्यास आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेतही आयोगाने दिले आहेत.