|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » शेवटचा वर्ल्डकप खेळणाऱया ख्रिस गेलची जिमऐवजी योगाला पसंती

शेवटचा वर्ल्डकप खेळणाऱया ख्रिस गेलची जिमऐवजी योगाला पसंती 

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आपली पाचवी व शेवटची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळणाऱया विंडीजच्या ख्रिस गेलने तंदुरुस्ती राखण्यासाठी स्वतःचा वेगळा फॉर्म्युला तयार केला असून यानुसार, मागील दोन महिन्यांपासून तो जिम टाळत त्याऐवजी योगाला पसंती देत आहे. युनिव्हर्स बॉस या नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल सध्या 39 वर्षांचा असून आपल्या शेवटच्या विश्वचषकात सर्वोत्तम मोहोर उमटवण्याचा अर्थातच त्याचा प्रयत्न असणार आहे.

शक्य तितका योगा करणे आणि मसाज करवून घेणे यावर ख्रिसचा सध्या भर रहात आला आहे. जिममध्ये जात नसल्याने यातच बराच वेळ वाचत असल्याचे त्याचे निरीक्षण आहे. अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने 40.83 च्या सरासरीने 490 धावांची आतषबाजी करत आपल्या फॉर्मचा दाखला दिला. तोच धडाका आता प्रत्यक्ष विश्वचषकातही कायम राखण्याचा त्याचा मानस आहे.

‘कोणालाही वाढते वय लपवता येत नाही. वय वाढत असतानाच चपळता कमी होत असते. कोणत्याही मैदानी खेळात हा अविभाज्य घटकच असतो. पण, सध्या तंदुरुस्ती राखण्यासाठी मी जिम टाळतो आहे. याऐवजी अनुभव व मानसिक खंबीरपणावर माझा भर रहात आला आहे’, असे वनडेत 10151 धावा जमवणाऱया या दिग्गज फलंदाजाने नमूद केले.

इंग्लंडविरुद्ध मागील वनडे मालिकेत 4 डावातच त्याने तब्बल 424 धावांची आतषबाजी करताना 2 शतके व दोन अर्धशतकांची रास ओतली होती. तोच धडाका येथे कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. संघातील आपले तरुण खेळाडू विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलतील, असा गेलला विश्वास वाटतो. जागतिक स्तरावर धडाकेबाज खेळी साकारत आलेल्या ख्रिस गेलने आजवर 103 कसोटी, 289 वनडे व काही टी-20 लीग खेळत असताना वरचष्मा गाजवण्यात कसर सोडलेली नाही.

‘मी खेळत रहावे, निवृत्त होऊ नये, असा आग्रह चाहत्यांनी धरला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. मी खेळतो, तो चाहत्यांसाठी खेळतो. पण, इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी खेळत राहीन, असे मला स्वतःला कधीच वाटले नव्हते. आता विश्वचषकात मी आणखी जोरदार खेळेन आणि विश्वचषक जिंकून देणे, हेच लक्ष्य असेल’, असे 1999 मध्ये पदार्पण करणारा ख्रिस गेल याप्रसंगी म्हणतो. मध्यंतरी ख्रिस गेल व विंडीज क्रिकेट मंडळातील वाद बराच टोकाला पोहोचला. पण, आता परिस्थिती बदलली असल्याचा त्याचा दावा आहे.

‘मागील काही महिन्यात विंडीज क्रिकेट मंडळात बरेच बदल झाले आहेत. कॅरेबियन्ससाठी क्रिकेट सर्वात महत्त्वाचे आहे आणि भविष्यातही राहील’, इतके भाष्य गेलने यावर केले. मायदेशात इंग्लंडला धूळ चारल्यानंतर ही परिस्थिती बदलली व मंडळ आपल्याला अनुकूल झाले, असा त्याचा दावा आहे. विश्वचषक स्पर्धा ही आम्ही स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मानतो, असे तो शेवटी म्हणतो.