|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नोकऱयांसाठी ‘रोड मॅप’ तयार करावा

नोकऱयांसाठी ‘रोड मॅप’ तयार करावा 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी युवकांना शस्त्रे हाती घेण्याचा दिलेला सल्ला युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी खोडून काढला असून युवकांना नोकऱया देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘रोड मॅप’ तयार करावा, अशी मागणी केली आहे. सरकारमध्ये राहून गोवा फॉरवर्डने सरकारविरोधात आवाज उठवून जनतेच्या तोंडाला पाने पुसू नयेत. हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडा, असे आव्हान युवक काँग्रेसने दिले आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत युवक काँग्रेस पदाधिकारी अर्चित शांताराम नाईक व इतरांनी गोवा फॉरवर्ड तसेच भाजपवर जोरदार हल्ला केला. गोवा फॉरवर्ड हा पक्ष सरकारमध्ये सामील आहे. त्या पक्षाचे युवा कार्यकर्ते गोवा विद्यापीठात जाऊन तेथील चुकीच्या नोकरभरतीविरोधात आवाज उठवतात. तुमचे सरकार असताना अशी चूक कशी काय होते? असा सवाल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विरोधात बोलण्याचे काम विरोधी पक्षाचे असून सत्ताधारी पक्षाचे नव्हे. तेव्हा हा शो करू नका. सरकारमधून बाहेर पडा मग युवक काँग्रेस तुम्हाला या गोवा विद्यापीठ नोकर भरती प्रकरणी पाठिंबा देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नोकरभरती किंवा नोकऱयांचा विषय तेवढा महत्वाच नाही, अशे वक्तव्य करतात आणि कारवारला गेले असताना तेथील युवकांना नोकऱयांची आश्वासने देतात. हा प्रकार गोमंतकातील युवकांसाठी अन्यायकारक असून त्यांना नोकऱया मिळणे मुश्कील झालेले असताना डॉ. सावंत हे कारवारच्या युवकांना नोकऱया देवू पाहतात. या त्यांच्या वक्तव्याचा युवक काँगेसच्या पदाधिकाऱयांनी निषेध नोंदविला आहे.

सरदेसाई यांच्या विरोधात नोंदविलेली पोलीस तक्रार योग्यच असून त्यांच्यावर तक्रारीत कलमानुसार कारवाई झालीच पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांवर तक्रारी नोंदविल्या जाता. त्याच कारवायातंर्गत तक्रारी केल्या तर कुठे बिघडले? असा प्रतिप्रश्न युवक काँग्रेस पदाधिकाऱयांनी केला आहे.