|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाटी शिवोली येथे बेकायदेशीर काढलेला 232 क्युबीक रेतीसाठा जप्त

भाटी शिवोली येथे बेकायदेशीर काढलेला 232 क्युबीक रेतीसाठा जप्त 

प्रतिनिधी/ म्हापसा

भाटी शिवोली येथे शापोरा नदीच्या पात्रात असलेल्या किनारी भागात घर बांधणीसाठी वापरण्यात येणाऱया रेतीचा 232 क्युबीक मीटर साठा जप्त केला. ही रेती सुमारे 35 ट्रक होत असल्याची माहिती बार्देशचे संयुक्त मामलेदार कृष्णा गावस यांनी दिली. रेती उपसण्यावर बंदी असूनही या भागात मोठय़ा प्रमाणात रेतीचा साठा काढीत असल्याची लेखी तक्रार आल्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मामलेदारांनी दिली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बुधवारी अचानक घातलेल्या धाडीत येथे बेकायदेशीररित्या रेती काढणाऱयांचे धाबे देणाणले असून या प्रकरणी खाण संचालनालय अधिकारी वर्गांनी एकूण 12 होडय़ा जप्त केल्या. काहींनी आपल्या होडय़ा तेथेच सोडून तेथून पळ काढला. गेल्या वर्षभरापासून या भागात बेकायदेशीर रेती उसपा सुरू होता त्यामुळे या भागात होडीद्वारे मासेमारी करणाऱयांना त्रास होत होता. काहींनी याबाबत स्थानिक मरीन पोलीस स्थानकावर तक्रार केली होती. मात्र मरीन पोलीस याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर ही तक्रार खाण संचालनालयाकडे केल्यावर बुधवारी सकाळी काही स्थानिकांनी आपले वजन वापरून अधिकाऱयावर ही कारवाई बंद करण्यास दबाव आणला मात्र त्या दबावाला न जुमानता ही कारवाई सुरूच ठेवली.

अधिकारी वर्गानी अंदाजे 35 ट्रक रेती जप्त करण्यात यश मिळविले आहे. त्या रेतीचा ताबा खाण संचालनालयाच्या अधिकाराखाली धाड पडताच येथे उपस्थित असलेल्या काही कामगारांनी आपल्या होडय़ा तेथेच सांडून पैलतिरी चोपडेच्या बाजूनी होडय़ातून पळ काढला. घटनास्थळी अधिकाऱयांनी एकूण 12 होडय़ा ताब्यात घेतल्या. गेल्या वर्षभरात गुपचूपरित्या, बेकायदेशीररित्या येथे होडय़ाद्वारे रेती काढण्याचे काम सुरू होते. रेती काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या 12 होडय़ा व इतर साधने अधिकाऱयांनी जप्त केले. या भागातील नागरिकांनी एक होडीवरून दोन-तीन होडय़ा खरेदी केल्या होत्या व ते या भागात बेकायदेशीररित्या रेती काढत होते. विशेष म्हणजे या शापोरा नदीच्या पात्रातच अवघ्या शंभर मीटरच्या हाकेवर मरीन पोलीस स्थानक असून हा प्रकार त्याना माहिती नसल्यानमे अधिकारी वर्ग अश्चर्य व्यक्त करीत आहेत.

झालेल्या कारवाईत घटनास्थळावरून 12 होडय़ा रेतीसह ताब्यात घेतल्याची माहीती खाण संचालक सुधीर मांद्रेकर यांनी दिली. बार्देशचे संयुक्त मामलेदार कृष्णा गावस व खाण संचालक सुधीर मांद्रेकर यांच्या उपस्थितीत सुमारे 35 ट्रक रेती संरक्षण जागेत जमा करण्यात आले असून ती सील करण्यात आली आहे. कायदेशीर सोपस्कर पूर्ण केल्यानंतर या जप्त केलेल्या रेतीची पावणीच्या स्वरूपात विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती संयुक्त मामलेदार सुधीर मांद्रेकर यांनी यावेळी पत्रकारांना दिली.

दरम्यान या ठिकाणी यापुढे कडक पोलीस पाहारा ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधिकारी वर्गानी दिली. दरम्यान जप्त करम्यात आलेल्या रेतीची किंमत 210000 लाखाहून अधिक होत असल्याची माहिती अधिकारी वर्गानी दिली.