|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विठूकाकांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी

विठूकाकांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी 

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये याळगी घराण्याचे मोठे योगदान आहे. या घराण्यातील तब्बल 16 जणांनी तुरूंगवास भोगून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोविंदराव याळगी यांनी सुरू केलेला हा स्वातंत्र्य संग्राम विठ्ठलराव याळगींनी पुढे चालू ठेवला. विठूकाकांनी राष्ट्र सेवादल, गांधीवादी विचार व त्यानंतर समाजकार्य अशा विविध भूमिका चोख पार पाडल्या. त्यामुळे त्यांचे हे कार्य तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी काढले.

बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघ तसेच विविध संस्थांनी एकत्रित येऊन बुधवारी ज्ये÷ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगींचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी त्यांच्या कार्याचा आढावा घेताना प्राचार्य मेणसे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ऍड. राम आपटे, वाय. बी. चौगुले, ऍड. नागेश सातेरी, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेचे नवे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी, माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, प्रा. विनोद गायकवाड, तरुण भारत ट्रस्टचे सचिव जगदीश कुंटे, किशोर काकडे, लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी, सुभाष होनगेकर, मोहन सावनूर उपस्थित होते.

जगदीश कुंटे म्हणाले, विठूकाका हे संपूर्ण बेळगावकरांना पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाबरोबरच नाटय़क्षेत्रातही तितकेच योगदान दिले आहे. त्यामुळे बेळगावच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी त्या काळात बेळगावमध्ये नाटक रूजवण्याचे काम केल्यामुळेच आज अनेक नाटय़ कलाकार घडू शकले, असे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना विठ्ठल याळगी म्हणाले, त्या काळात जाज्वल्य देशप्रेमामुळे आम्ही स्वातंत्र्य संग्रामात गेलो. या संग्रामामधून एक वेगळय़ाच प्रकारची उर्जा मिळाली. या उर्जेवरच आजवर कार्य करत गेल्याचे त्यांनी सांगितले. ऍड. राम आपटे म्हणाले, तरुणांनाही लाजवेल असे कार्य या वयातही विठ्ठल याळगी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन बामणे यांनी केले. यानंतर शहरातील विविध संघटनांच्या वतीने विठ्ठलराव याळगींचा भव्य सत्कार करण्यात आला. 

अन् विठू काकांनी सार्वजनिक वाचनालयावर तिरंगा फडकविला

9 ऑगस्ट 1942 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी बेळगावमध्ये मोठा सत्याग्रह सुरू केला होता. त्यावेळी इंग्रजांनी तिरंगा फडकविणाऱयांवरही कारवाई करण्यास सुरू केली होती. याचवेळी विठ्ठलराव व गजानन याळगी यांनी गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सर्वात उंच मनोऱयावर चढून रात्रीच्या अंधारात तिरंगा फडकविल्याची आठवण प्रा. मेणसे यांनी करून दिली.