|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी जनावरांच्या बाजाराला ‘टँकर आधार’

निपाणी जनावरांच्या बाजाराला ‘टँकर आधार’ 

वार्ताहर /निपाणी :

निपाणीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रत्येक गुरुवारी जनावरांचा आठवडी बाजार भरविण्यात येतो. या बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होते. यातून कृषी उत्पन्न बाजार समितीला उत्पन्नही मिळते. पण येथे मूलभूत सुविधा पुरविण्याकडे नेहमीच प्रशासनाने कानाडोळा केला आहे. सध्या येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कूपनलिका दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे या जनावरांच्या बाजाराला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील पशुपालकांकरिता विश्वासू बाजारपेठ अशी निपाणी जनावरांच्या बाजाराची ख्याती आहे. प्रशस्त खुल्या जागेत भरणाऱया या बाजारात म्हैशी, गायी, बैल, बकरी, शेळी, मेंढी खरेदी विक्रीतून प्रती आठवडय़ाला मोठी उलाढाल होते. या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून कृषी उत्पन्न बाजार समितीला कर रुपी उत्पन्नही प्राप्त होते. अशा बाजारपेठेत मूलभूत सुविधांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

असे असताना येथील पाण्याची सोय असणारी कूपनलिका पाणी पातळी घटल्याने अनेक महिन्यांपासून बंद आहे. ही अडचण दुरुस्ती करून पुर्वरत सुरू करण्याची जबाबदारी असताना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याचा फटका बाजारात आणल्या जाणाऱया जनावरांना बसत असून जनावरे पाण्याविना तहानेने व्याकूळ होत आहेत. याची तात्पूरती सोय म्हणून सध्या प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पण ही सोय अपुरी आहे. यासाठी कूपनलिका त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

बाजारावर मंदीचे सावट

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढताना पाणी समस्या गंभीर रुपधारण करत आहे. दुसरीकडे चाऱयाचा प्रश्नही चिंता वाढवत आहे. यामुळे जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर विपरीत परिणाम होत असून बाजारावर मंदीचे सावट गडद झाल्याने दिसत आहेत.