|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वीज ग्राहकांना ऍडिशनल डिपॉझिटचा ‘शॉक’

वीज ग्राहकांना ऍडिशनल डिपॉझिटचा ‘शॉक’ 

बेळगाव / प्रतिनिधी :

हेस्कॉमकडून वीज ग्राहकांना या महिन्यात ऍडिशनल सेक्मयूरिटी डिपॉझीट रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना मागील महिन्याच्या बिलासोबतच ही अतिरिक्त रक्कम भरावी लागत असल्याने आर्थिक बोजा पडला आहे. अधिक वीज वापरणाऱया ग्राहकांना वर्षाची एकूण सरासरी करून ही डिपॉझीट रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हेस्कॉमकडून आर्थिक शॉक देण्यात आला आहे.

वर्षभरात येणारे वीजबिल याची सरासरी करून ही ऍडिशनल डिपॉझीट रक्कम ठरविण्यात येत आहे. सुरळीत विजेचा वापर करणाऱया ग्राहकांना 500 ते 700 रूपये या पटीत ही रक्कम भरावी लागणार आहे. तर ज्या ग्राहकांचा वापर अधिक आहे त्यांना अधिक रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरण्यासाठी नोटीस आल्यापासून 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना ही रक्कम दिलेल्या काळातच भरावी लागणार आहे.

ग्राहकांना देण्यात आलेल्या नोटीसीमध्ये हेस्कॉम कॅश काऊंटर, कर्नाटक वन, ऑनलाईन माध्यमातून पैसे भरता येतील असे नमुद असले तरी सॉफ्टवेअर अपडेट होत नसल्यामुळे सध्या तरी नागरिकांना मुख्य उपकेंद्रावर जाऊन तेथे भरावे लागत आहे. त्यामुळे इतर कामे बाजुला ठेवून नागरिकांना रांगांमध्ये उभे राहून ही रक्कम भरावी लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ए. एम. शिंदे (सहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम)

जानेवारी ते डिसेंबर असे वर्षभर येणाऱया बिलाची सरासरी करून अधिक वीज वापरणाऱया ग्राहकांना ऍडिशनल सिक्मयुरीटी डिपॉझीट रक्कम भरण्यास सांगण्यात आली आहे. सध्या बेळगाव वन तसेच ऑनलाईनद्वारे ही सेवा उपलब्ध नसली तरी येत्या दोन दिवसात ती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या हेस्कॉमच्या रेल्वेस्टेशन व नेहरूनगर येथील कॅश काऊंटरवर सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत ही रक्कम भरून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.