|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खरेदीच्या बहाण्याने दागिने पळविण्याचा प्रयत्न

खरेदीच्या बहाण्याने दागिने पळविण्याचा प्रयत्न 

प्रतिनिधी / बेळगाव :

दागिने खरेदीच्या बहाण्याने गणपत गल्ली येथील एका सराफी पेढीत गेलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी सोन्याच्या अंगठय़ा चोरण्याच्या प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यासंबंधी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली नव्हती.

गणपत गल्ली येथील एका सराफी पेढीत दोन बुरखाधारी महिला दाखल झाल्या. दुपारी 3.30 ची वेळ होती. दुकानात गर्दी होती. त्या महिलांनी दुकानदारांना अंगठय़ा दाखविण्यास सांगितले. अंगठय़ा काढून देताच एकूण सात ग्रॅम वजनाच्या दोन अंगठय़ा बाजूला काढून त्या महिलांनी बनावट सोन्याच्या अंगठय़ा कॉंऊन्टरवर ठेवल्या.

 महिलांसमवेत एक बाळही होते. हा प्रकार उघडकीस येताच दुकान मालक व नागरिकांनी दोन महिलांना पकडून ठेवले. खडेबाजार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास हाती घेतला. या महिलांनी अंगठय़ा चोरल्याचे फुटेजवरून उघडकीस येताच त्यांना पोलीस स्थानकात आणण्यात आले. महिलांनी बाजूला काढून ठेवलेल्या सात ग्रॅमच्या दोन अंगठय़ा त्यांच्याजवळच होत्या. पोलिसांनी त्या दुकानदाराला परत केल्या. त्यानंतर दोन्ही महिलांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी आपली नावेही व्यवस्थित सांगितली नाहीत. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी फिर्याद दाखल झाली नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.

अखेर खबरदारीची उपाययोजना म्हणून अस्मा बेपारी (वय 28 रा. काकती), यास्मीन किल्लेदार (वय 30 रा. वीरभद्रनगर) या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर गणपत गल्ली परिसरात गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती.