|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वर्णे, अंगापूरच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा

वर्णे, अंगापूरच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा 

प्रतिनिधी /नागठाणे :

सातारा तालुक्यातील अपशिंगे (मि.)पाठोपाठ वर्णे व अंगापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आंतरराष्ट्रीय शाळा बनण्याचा बहुमान संपादन केला आहे. जिह्याच्या शिक्षण क्षेत्राच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जात आहे.

अपशिंगे (मिलिटरी), वर्णे त्याचबरोबर अंगापूर येथील शाळा क्रमांक एक या दहा किलोमीटर परिघातील शाळा आहेत. एकाच वेळी या तिन्ही शाळांनी संपादन केलेले हे यश कैतुकास्पद ठरणारे आहे. अलीकडच्या काळात अपशिंगे येथील शाळा प्रथम आंतरराष्ट्रीय बनली. त्यानंतर वर्णे व अंगापूर (शाळा क्रमांक एक) याही शाळा आंतरराष्ट्रीय शाळांच्या पंक्तीत जाऊन पोहोचल्या आहेत. नुकतीच याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. सातारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय शाळांच्या निकषान्वये वर्णे व अंगापुरातील शाळांची पाहणी करण्यात आली होती. त्यातील सर्व मानकांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी या दोन्ही शाळांनी केली. 

संबंधित गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पदाधिकाऱयांचे मार्गदर्शन, अधिकाऱयांनी केलेले प्रयत्नही याकामी महत्वाचे ठरल्याचे धुमाळ यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय दर्जामुळे इथल्या शिक्षण पद्धतीत येत्या शैक्षणिक वर्षापासून आमुलाग्र बदल करण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम बालवर्ग ते तिसरी इयत्तेपर्यंत शिकविला जाणार आहे. शाळेत आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकही उपलब्ध होणार आहेत. तालुक्यातील कोडोली व लिंब येथील प्राथमिक शाळा आंतरराष्ट्रीय शाळा बनविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.