|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बाप-लेकाच्या मृत्यूने अख्खं गाव हेलावलं

बाप-लेकाच्या मृत्यूने अख्खं गाव हेलावलं 

श्रावणमधील घटना काळीज पिळवटणारी : हसत्या-खेळत्या संसाराला नियतीची दृष्ट

पती व मुलगा गमावलेल्या मयुरच्या आईचा आक्रोश हृदय हेलावणारा

वार्ताहर / आचरा:

 उन्हाळी सुटीत गावी आलेल्या श्रावण नदीवाडीतील महेश चंद्रकात वेदरे (40) व मुलगा मयुर महेश वेदरे (12) यांचा घरापासून काही अंतरावर असलेल्या नदीत आंघोळ करण्यास गेले असता, पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने वेदरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हसत-खेळत असणाऱया पिता-पुत्राला मृत्यूने कवटाळले. पती व मुलाच्या अचानक जाण्याने धक्का बसलेल्या मयुरच्या आईचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. मूळ श्रावणचा असलेला व नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्या महेश व त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर तेथील स्मशानभूमीत मध्यरात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 श्रावण नदीवाडीत बालपण, शालेय जीवन घालविलेले महेश हे नोकरीनिमित्त मुंबईला 10 वर्षांपूर्वी स्थिरावले. नोकरीनिमित्त मुंबईत संसार थाटला असला, तरी जशी सुटी मिळेल, तसे गावी येणारे महेश या मे महिन्यात आठ दिवसांपूर्वी पत्नी व मुलासमवेत गावी आले होते. आठ दिवस गावात राहून जुन्या आठवणीत रंगून गेलेले महेश शुक्रवारी पुन्हा मुंबईला परतणार होते. मात्र, नियतीने एक दिवस अगोदरच मुलासह त्यांच्यावर काळाचा घाला घातला.

गरिब कुटुंबाचा आधार तुटला

 महेश वेदरे यांच्या घरची परिस्थिती बेताचीच. त्यांचे वडील शेळीपालन व शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडिलांना हातभार लागावा म्हणून गावातच शिक्षण घेऊन महेश यांनी मुंबईला जाऊन त्यांनी तिथे नोकरी पत्करली होती. मुंबईत जाऊन महेश यांना दहा वर्षे झाली होती. मात्र, त्यांना गावची ओढ कायम होती. गावी असलेल्या आई-वडिलांकडे ते नेहमी येत असत. महेश यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

पिता-पुत्र गेले होते आंघोळीला

गुरुवारी सायंकाळी महेश यांना श्रावण नाक्यावर जायचे होते. मात्र, आंघोळ आटोपूनच नाक्यावर जाऊ, असा विचार करून महेश हे मुलगा मयुर याला घेऊन 5.30 वाजता रोजच्या प्रमाणे नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांची चुलत बहीणही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. महेश मुलाला खांद्यावर घेऊन पाण्यात उतरून आंघोळ करीत होते. यावेळी चुलत बहिणीने त्यांना पाण्यात पुढे न जाण्याची सूचनाही केली होती. त्यानंतर ती कपडे धुण्याच्या कामात व्यस्त होती. काही वेळाने समोर पाहिले असता, भाऊ महेश व मयुर दिसत नसल्याने तिने मोठमोठय़ाने हाका मारल्या. मात्र, कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिला दोघे बुडाल्याचा संशय आला. ती मोठमोठय़ाने मदतीसाठी हाका मारत नजीक असलेल्या घराच्या दिशेने धावत सुटली आणि नदीत उतरलेले ते दोघे दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिकांनी धावाधाव करीत त्यांना नदीत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेश व त्यांचा मुलगा मयुर हे मृतावस्थेत आढळून आले.

आईचा मन हेलावणारा आक्रोश

 सायंकाळी डोळय़ादेखत घरातून आंघोळीसाठी निघालेला पती महेश व मुलगा मयुर यांना मृतावस्थेत बघून मयुरच्या आईचा आक्रोश मन हेलावणारा होता. नेहमी हसत-खेळत समोर असणारा पती व मुलगा अशा दोघांनाही काही क्षणात मृत्यूने कवटाळले होते. तिचा हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला होता.