|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपजिल्हा रूग्णालयातील दुसरे सोनोग्राफी मशिनही धुळखात

उपजिल्हा रूग्णालयातील दुसरे सोनोग्राफी मशिनही धुळखात 

वार्ताहर/ कराड

गतवर्षी सलग सहा ते सात दिवस मनसेच्या मनोज माळी व कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केल्यानंतर कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात नवीन सोनोग्राफीचे मशिन आले खरे, पण रेडिओलॉजिस्टच उपलब्ध न झाल्याने गेल्या वर्षभरापासून सोनोग्राफिचे मशिन धुळखात पडले आहे. सिटी स्कॅनच्या मशिनचीही तीच अवस्था आहे. एकीकडे आपल्या कामाचा देशपातळीवर ठसा उमटवणाऱया उपजिल्हा रूग्णालयाकडे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने कोटय़वधी रूपयांची वैद्यकीय यंत्र सामुग्री असतानाही गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा मिळत नाहीत.

कराडच्या उपजिल्हा रूग्णालयाने प्रसूती विभागात केलेल्या कामाचा राज्य व देशपातळीवर गौरव करण्यात आला आहे. उपजिल्हा रूग्णालयाला केंद्र शासनाच्या वतीने नुकतेच एमसीएच विंगही मंजूर केले आहे. एकीकडे प्रसुती व नवजात शिशु व बालक विभागाचे चांगले काम असताना रूग्णालयातील अन्य विभाग मात्र केवळ नावाला उरले आहेत. 100 बेडची संख्या असलेल्या या रूग्णालयात अनेक तज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. वर्षभरात जवळपास 4 हजार प्रसुती व 800 ते 1000 सिझरच्या शस्त्रक्रीया होणाऱया उपजिल्हा रूग्णालयात भुलतज्ञ नाही. तर दंत रोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, फिजीशियन उपलब्ध नाही. नेत्र रोग विभागासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.

महामार्गावर होणारे अपघात, घातपात व रूग्णांची संख्या पाहता शासनाने उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ट्रामा सेंटर व तज्ञ डॉक्टर उपलब्ध करावेत. तसेच उपजिल्हा रूग्णालयाला 200 बेडची मान्यता मिळावी, यासाठी गत वर्षी सामाजिक कार्यकर्ते मनोज माळी व कार्यकर्त्यांनी सहा ते सात दिवस उपजिल्हा रूग्णालयासमोर आमरण उपोषण केले. यावेळी आरोग्य सचिवांनी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार 8 मार्च 2018 रोजी नवीन सोनाग्राफी मशिन रूग्णालयाला देण्यात आले मात्र यासाठी लागणारा रेडिओलॉजिस्ट उपलब्ध न झाल्याने एक वर्षांपासून सोनोग्राफी मशिन धुळखात पडले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा रूग्णालयातील रेडिओलॉजिस्टना आठवडय़ातून किमान एक दिवस उपजिल्हा रूग्णालयात काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र संबंधित रेडिओलॉजिस्टने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

आंदोलनानंतर उपजिल्हा रूग्णालयाला सिटी स्कॅनचे मशिनही देण्यात आले मात्र तेही धुळखात पडले आहे. तर 200 बेडचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. रिक्त डॉक्टरांच्या जागा अद्यापही भरलेल्या नाहीत. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱया रूग्णांना आरोग्य सेवा मिळत नाहीत. यापूर्वी एक सोनोग्राफीचे मशिन केवळ वापराविना पडून राहिल्याने नादुरूस्त झाले आहे. आता नवीन सोनोग्राफी मशिनही खराब व्हायच्या आत सुरू करण्याची मागणी होत आहे.