|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उसप येथील युवकाची गोव्यात आत्महत्या

उसप येथील युवकाची गोव्यात आत्महत्या 

गोव्यात हॉटेलमध्ये होता कामाला

रामचंद्र हा एकुलता एक मुलगा

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यातील उसप गावातील 22 वर्षीय युवक रामचंद्र विष्णू मोरजकर याने गोव्यात राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उसप येथील त्याच्या गावी शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

या बाबतची मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र मोरजकर हा नितीन या नावानेही गावात परिचित होता. गावात प्राथमिक व तेथेच बापूसाहेब देसाई विद्यालय उसप येथे माध्यमिक शिक्षण त्याने पूर्ण केले, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण न्यू इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी येथे पूर्ण केले. पुढे त्याने हॉटेल मॅनेजमेंटकडे जाण्याचा निर्णय घेतला व गोव्यात शिक्षण घेतले. सहा/सात महिन्यांपूर्वी तो कळंगुट-गोवा येथे एका हॉटेलमध्ये कामाला गेला होता. या हॉटेलच्याच कामगारांसाठी असणाऱया खोल्यांमध्ये रामचंद्र राहायचा. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याने खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले.

 एकुलता एक मुलगा

  रामचंद्रच्या पश्चात एक विवाहित व एक अविवाहित बहीण, आई-वडील असा परिवार आहे. रामचंद्र हा एकुलता एक मुलगा होता. आई-वडिलांनी शेती व मोलमजुरी करून त्यांनी रामचंद्रला शिक्षण दिले. त्याच्या निधनाने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

 सरपंच दिनेश नाईक म्हणाले, रामचंद्र असे पाऊल उचलेल, असे स्वप्नातही वाटले नाही. गावातील सामाजिक कार्यक्रमात तो आवडीने सहभागी व्हायचा. त्याच्या अशा जाण्याची बातमी समजताच आम्हा मित्रपरिवारासह गावालाही धक्का बसला आहे.