|Friday, November 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » दाही दिशांना पसरणार ‘बाळूमामां’ची कीर्ती

दाही दिशांना पसरणार ‘बाळूमामां’ची कीर्ती 

महाराष्ट्र ही संतांची भूमी. या भूमीतील दक्षिण महाराष्ट्रातले एक थोर संत म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजतेय. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचे दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान बनलेय. या मालिकेतील संत बाळूमामांचे बालपणातले रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली आणि अवघा महाराष्ट्र ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषाने दुमदुमला.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या मालिकेतील बालअवतारातील बाळूमामांना रसिकांनी देवत्व देण्याबरोबरच आपल्या घरातल्या लाडक्या व्यक्तीसारखे प्रेम केले. त्यामुळेच छोटे बाळूमामा हे महाराष्ट्रातील घराघरातले लाडके व्यक्तिमत्व बनले. बाळूमामांबरोबरच त्यांना सतत आधार देणारी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्याची आई सुंदरा, त्यांना सतत विरोध करणारा त्यांचा पिता मयप्पा, गावातील पंच, वैजयंता, कळलाव्या तात्या, महादू, देवप्पा, मंगळू, गंगी, सत्यवा ही पात्रे मालिकेतील पात्रे न रहाता प्रेक्षकांच्या घरातलीच पात्रे बनली आहेत.

आता मालिकेत बाळूमामांचे बालपण संपणार आहेत. आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोटय़ा गावात आणि गावकऱयांमध्ये चैतन्य फुलवणारे बाळूमामा मालिकेत आता लवकरच मोठय़ा रुपात दिसतील. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरू होणार असून यात बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे. दिनदुबळय़ांचा कैवार घेणारे, गरिबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे संत बाळूमामा यांची ही चरित्रगाथा एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. महान संताची चरित्रगाथा ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ आजपासून आता आणखी रंजक स्वरुपात पाहायला मिळेल.

Related posts: