|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पारा चाळीशीत, निपाणीकर घामाघूम

पारा चाळीशीत, निपाणीकर घामाघूम 

प्रतिनिधी/ निपाणी

मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसामध्ये निपाणी शहर व परिसरात तापमानामध्ये चढउतार होत होता. मात्र त्यानंतरचे दहा दिवस पारा वाढतच गेला. सोमवारी निपाणीत तापमान 40 अंश सेल्सियस इतके दिसून आले. त्यानुसार तापमानाने या महिन्यात पहिल्यांदा तर या हंगामामध्ये पाचव्यांदा चाळीशी गाठली. गेल्या चार दिवसात तर वाढत्या तापमानाने निपाणीकर चांगलेच घामाघूम झाल्याचे पहायला मिळाले.

निपाणीतील कृषी संशोधन केंद्राकडे असलेल्या नोंदीप्रमाणे यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत अधिकतर 35 अंशापर्यंत तापमान होते. एप्रिल महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून यात झपाटय़ाने बदल होत गेला. या हंगामात पहिल्यांदा 13 एप्रिल रोजी तापमान 40 अंशावर गेले. यानंतर काहीशी घसरण झाली. मात्र महिनाअखेरीस म्हणजे 26, 27 व 28 एप्रिल असे सलग तीन दिवस तापमान 40 अंशावर होते. या तीन दिवसात शहर व परिसरात उष्णतेची लाटच दिसून आली.

यानंतर मात्र काही प्रमाणात झालेला वळीव पाऊस तसेच त्यानंतर 4 दिवस असणारे ढगाळी वातावरण याचा परिणाम म्हणून तापमानात चढउतार होत राहिला. पण गेल्या आठवडाभरातून तर उष्णता अधिकच जाणवत आहे. 16 मे रोजी 37 अंशावर असणारा पारा 17 व 18 रोजी 39 अंशावर तर 19 मे रोजी 38.5 अंशावर होता. यानंतर सोमवारी शहरात 40 अंशावर उष्णतेचा पारा दिसून आला. या वाढत्या उष्णतेमुळे शहरात पादचाऱयांना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. दुपारच्या वेळेस बहुतांशी बाजारपेठेत शांतता दिसत आहे.

अद्याप 15 दिवस करावा लागणार सामना

सध्या उन्हाळा अखेरच्या टप्प्यात असून आता परिसरात पावसाचे वेध लागले आहेत. यंदा उन्हाळय़ात वळिवाने हुलकावणी दिल्याने आणि यातच तीव्र उष्णतेने शेतकरी वर्गासह सर्वच वयोगटातील नागरिक हैराण झाले आहेत. अद्याप किमान 15 दिवस तरी परिसरात तापमान वाढ राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.