|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषकात धोनी भारताचे ‘ट्रम्प कार्ड’ असेल : झहीर अब्बास

विश्वचषकात धोनी भारताचे ‘ट्रम्प कार्ड’ असेल : झहीर अब्बास 

वृत्तसंस्था \ नवी दिल्ली

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा ‘मेंदू’ असून त्याच्या दीर्घ अनुभवामुळे येत्या विश्वचषक स्पर्धेत तो भारताचा ‘हुकमी एक्का’ ठरणार आहे, असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांनी व्यक्त केले आहे.

भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. त्यानंतर 2011 मध्ये वनडे विश्वचषकही त्याच्याच नेतृत्वाखाली भारताला मिळाला. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2010 व 2016 असे दोनदा आशिया चषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स करंडक जिंकला आहे. यष्टीमागील त्याचे कौशल्य, चपळता अजूनही टिकून आहे. मात्र बेस्ट फिनिशर या लौकिकाला अलीकडे थोडासा तडा गेला आहे. मात्र विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत धोनीचा अनुभव संघासाठी निश्चितच मोलाचा व उपयुक्त ठरेल, असे अब्बास यांना वाटते.

‘भारताकडे महेंद्रसिंग धोनी नावाचा एक जिनियस खेळाडू संघात आहे. तो या संघाचा मेंदूच आहे, असे म्हणता येईल. त्याला खेळाची खूप चांगली जाण असून दोन विश्वचषक जिंकण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. त्याचा हा अनुभव कर्णधार व प्रशिक्षकासाठी खूप मोलाचा ठरेल. तो त्यांचा ट्रम्प कार्ड असल्याचे म्हणता येईल,’ असे अब्बास म्हणाले ‘विराट कोहलीसाठी त्याच्या नेतृत्वाखालील ही विश्वचषक स्पर्धा असून कर्णधार म्हणून आपली योग्यता सिद्ध करण्यास तोही उत्सुक झाला आहे,’ असेही ते म्हणाले.

भारताच्या बलाढय़ फलंदाजी लाईनअपसाठी इंग्लंडमधील खेळपट्टय़ा लाभदायक ठरणार आहेत. या ठिकाणी एका डावात 400-450 धावांची बरसातही होऊ शकते, असे त्यांना वाटते. ‘नुकत्याच झालेल्या इंग्लंड-पाक वनडे मालिकेत 300 हून अधिक धावा झाल्याचे आणि त्यांचा यशस्वी पाठलाग झाल्याचे आपण पाहिले आहे. विश्वचषकातही 450 धावांचा टप्पा गाठणे शक्य होईल असे वाटते. कारण या खेळपट्टय़ांवर गवत ठेवण्यात आलेले नाही आणि गोलंदाजांना वातावरणाची फारशी मदत मिळेल, असे वाटत नाही. अशी स्थिती फलंदाजांची भक्कम फळी असणाऱया भारताला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. आता इंग्लंडच्या खेळपट्टय़ा फलंदाजांच्या नंदनवन बनल्या आहेत,’ असे निरीक्षण त्यांनी मांडले.

चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, यावर बरीच चर्चा सुरू आहे. पण आघाडी फळीत फार बदल केले जाऊ नयेत, असे त्यांना वाटते. ‘हा पूर्णतः कर्णधाराचा निर्णय आहे. पण पहिल्या चार फलंदाजांचा क्रम वारंवार बदलण्याचा प्रकार केला जाऊ नये, असे मला वाटते. आघाडी फळीऐवजी खालच्या मध्यफळीतील क्रमात बदल करण्यास मात्र हरकत नाही,’ असे मत त्यांनी मांडले. अब्बास यांनी पाकतर्फे 1969 ते 1985 या कालावधीत 78 कसोटी व 62 वनडे सामने खेळले आहेत. भारतासह पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड हे उपांत्य फेरीचे दावेदार असतील, असे त्यांचे मत आहे. ‘या विश्वचषकात फिटनेस हा यशाचा प्रमुख मुद्दा ठरणार असून सर्वात फिट असणारे संघ शेवटच्या चारमध्ये दाखल होतील,’ असे ते म्हणाले.

पाकने क्षेत्ररक्षण सुधारावे

विश्चषकासाठी निवडलेला पाकिस्तानचा संघ हा उपलब्ध खेळाडूंतून निवडलेला सर्वोत्तम संघ असल्याचेही ते म्हणाले. इंग्लंडविरुद्धची मालिका विसरून त्यांनी आता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करावे आणि क्षेत्ररक्षण सुधारण्यावर अधिक भर द्यावा, असा सल्ला त्यांनी पाक संघाला दिला आहे. विश्वचषकात भारताला हरविणे पाकला आजवर जमलेले नाही. इतिहास भारताच्या बाजूने असला तरी पाककडे कोणत्याही संघाला हरविण्याची क्षमता आहे. भारत-पाक सामना कोणीही जिंकला तरी हा सामना म्हणजे ‘मॅच ऑफ द टूर्नामेन्ट’ असेल एवढे मात्र निश्चित, असे त्यांनी सांगितले. हा सामना 16 जून रोजी मँचेस्टरमध्ये होणार आहे.