|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पिठलं-भाकरी आणि मटकीची उसळ

पिठलं-भाकरी आणि मटकीची उसळ 

भाकरी हा पोळीचा पर्याय आणि पिठलं हा आयत्यावेळी झटकन होणारा भाजीचा पर्याय. ग्रामीण कथेत त्याची खमंग खुमासदार वर्णने असतात. त्याला अचानक हायफाय स्टेट्स लाभलं ती मार्केटिंगवाल्याची कसबकरणी!

अस्सल पिठल्यासाठी बेसन, मोहरी-तिखट-मीठ, पाणी आणि थोडंसं तेल पुरेसं आहे. उफाडय़ाचा बांधा असलेल्या मुलीला उंची पैठणी, केसात गजरा, चेहऱयावर एखादं प्रसाधन, लिपस्टिक हे व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिससारखे चार चांद असावेत तसं पिठल्यासाठी कांदा-लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याची चटणी हे मेकअपचे पदार्थ झाले. पिठलं-भाकरी असलेल्या थाळीत इतकं पुरेसं आहे. भाकरीवर तुपाचा किंवा अमूल लोण्याचा गोळा आणि शेजारी गाजर-बीटचे तुकडे, सॅलडची पानं म्हणजे मध्यमवर्गीय तरुण जोडप्याला हनिमूनसाठी पुण्याहून महाबळेश्वरला हेलिकॉप्टरने पाठवण्यासारखं झालं.

मजबूत जठर असलेले खवय्ये ज्वारी-बाजरीची शिळी भाकरीदेखील पिठल्याबरोबर लीलया रिचवू शकतात. सोबत बुक्कीत फोडलेला कांदा, लसूण-मिरचीचा आग्रह धरतात. तांदळाची भाकरी म्हणजे आकार बदललेला भातच की! तिला पाहिली की निवडणुकीत वातावरणाचा रागरंग बघून आयत्यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये किंवा भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्याची आठवण होते. ग्रामीण झणझणीत पिठलं देखील उंची हॉटेलच्या अनलिमिटेड थाळीमध्ये एखाद्या बाळवाटीत येतं तेव्हा केविलवाणं भासतं. त्यात त्याचा नेहमीचा जोश नसतो. भरपूर हळद आणि पाणी घातलेलं ते पिठलं चवीला किंचित घट्ट वरणासारखं लागतं.

हाय वेजवरचे धाबे तंदूर रोटीबरोबर पिठलं-भाकरीदेखील देतात. रिक्षात टेपरेकॉर्डर वाजवणारे प्रवाशांचा मूड बघून साऊंड कमी जास्त करतात किंवा आगखाऊ नेते सभेचा मूड बघून शिवराळ भाषा किंवा विकासाचे मुद्दे मांडतात त्याप्रमाणे धाबेवाले गिऱहाईक बघून पिठल्याचं तिखटपण ठरवतात. चिमणरावचा गुंडय़ाभाऊ त्यावर आडवा हात मारतो तशी पुलंच्या कथेतली ‘आपली सरोज खरे’ देखील ओठांवरचे लिपस्टिक न विस्कटता अर्धी भाकरी आणि पिठलं खाऊन नाजूक ढेकर देते.

थाळीत मटकीची उसळ कोणा दीडशहाण्याने घातली, समजत नाही. मटकी स्वतः कितीही रूचकर असली तरी भाकरीच्या संसारात अगदी सवतच आहे. अस्सल कडक भाकरीचा तुकडा मोडून पिठल्याबरोबर घास घेता येतो तसा उसळीबरोबर घेता येत नाही. मटकी गं मटकी तू मऊसूत फुलका किंवा पुरी किंवा फिरंग्यांच्या बेडबरोबरच नांदायला जा कशी!