|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी

सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी 

वार्ताहर / सावंतवाडी:

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या 77 व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती यांच्यावतीने सावंतवाडी शहरात भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक, हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत सहभागी झाले होते.

या दिंडीची सुरुवात सावंतवाडी शहरातील गांधी चौकात विधीवत धर्मपूजनाने करण्यात आली. अवी पाटणकर यांच्या हस्ते या धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. तर प्रदीप भालेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर दिंडीला सुरुवात झाली. क्षात्रवीरांनी व रणरागिणींनी क्षात्रवृत्ती जागृत करणारी लाठीकाठी, दंडसाखळी आदी प्रात्यक्षिके दाखवली. नऊवारी साडी परिधान केलेल्या रणरागिणी, पारंपरिक वेशात सहभागी झालेले कार्यकर्ते, क्रांतिकारकांच्या वेशातील बालसाधक, स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करणारे क्षात्रवीर हे या दिंडीचे वैशिष्टय़ ठरले. यात माणगाव येथील बाल संभाजी व्यायाम मंडळाच्या लहान मुलांसह युवकांनी सादर केलेल्या लाठीकाठी व दांडपट्टा प्रात्यक्षिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चेंदवण येथील श्री गणेश माऊली पाताळेश्वर ढोलपथकाने उपस्थितांमध्ये वीरश्री जागवली. चौकाचौकात मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

डॉ. आठवले यांनी भक्तियोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या साधना मार्गाचा संगम असलेल्या आणि आध्यात्मिक प्रगती करवून देणारा गुरुकृपायोग हा साधनामार्ग विकसित केला. आज सहस्र साधक या साधना मार्गातून साधना करत आहेत. डॉ. आठवले यांच्याचरणी या फेरीदरम्यात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या फेरीची सांगता गांधीचौक येथे सुमित सागवेकर यांच्या मार्गदर्शनाने झाली.