|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साटेली-भेडशी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

साटेली-भेडशी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम 

वार्ताहर / दोडामार्ग:

  शेतकऱयांच्या आर्थिक समृद्धीसाठी गटशेती हाच सक्षम पर्याय आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्या सुनंदा धर्णे यांनी साटेली येथे केले. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  साटेली-भेडशी येथे झाले. यावेळी सौ. धर्णे बोलत होत्या. साटेली-भेडशी येथील श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाच्या सभागृहात प्रशिक्षण सुरू आहे.

  सौ. धर्णे म्हणाल्या, येणारा काळ शेतकऱयांसाठी सुवर्णयुग असणार आहे. पण, आपण पूर्वीची पारंपरिक शेती पद्धती वगळून नवीन तंत्रज्ञान आणि गटशेतीला प्राधान्य द्यायला हवे. शेतकऱयांनी संघटित होऊन कंपन्या स्थापन करायला हव्या, उत्पादकता वाढवून मार्केटिंगमधील नवनव्या वाटा शोधल्या पाहिजेत. शेतकऱयांच्या उन्नतीचा विचार करून शासनाकडून शेतकऱयांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो, ही चांगली गोष्ट आहे. शेतकऱयांनी मात्र त्याचा लाभ घ्यायला हवा आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण व्हायला हवे, असे सांगून त्यांनी साटेली-भेडशी मतदारसंघात अशी प्रशिक्षणे वेळोवेळी व्हायला हवीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी प्रशिक्षक बाळासाहेब गाढवे, महेश आगम, मंडळ समन्वयक दीप्ती नाईक,  हर्षदा देसाई, प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी विनिता देसाई, नीता गवस आणि सुनील आरोसकर आदी उपस्थित होते. सौ. धर्णे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. साटेली भेडशी, कोनाळ, तेरवण मेढे, पाळये, घोटगे, परमे व परिसरातील गावातील अनेक शेतकरी प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.