|Sunday, August 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींच्या संभाव्य विजयामुळे पाकिस्तान अस्वस्थ

मोदींच्या संभाव्य विजयामुळे पाकिस्तान अस्वस्थ 

शेजारी देशाची निवडणूक प्रक्रियेवर नजर : प्रसारमाध्यमांमध्ये झळकतोय मुद्दा

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद 

भारताच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल पाकिस्तानला मोठी उत्सुकता आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानातही सर्वांच्या नजरा 23 मे रोजी लागणाऱया निवडणूक निकालावर केंद्रीत झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखणार असल्याच्या अनुमानाबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पाकचे वृत्तपत्त डॉनच्या संपादकीयामध्ये भारतातील निवडणूक निकालाबद्दल संभाव्य मांडणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांना हिंदू राष्ट्रवाद आणि आक्रमक राष्ट्रीय सुरक्षेच्या बळावर पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता यात वर्तविण्यात आली आहे. मोदींच्या संभाव्य दुसऱया कार्यकाळात पाकिस्तानसोबतचा तणाव कमी होण्याची कोणतीच शक्यता दिसून येत नाही. मोदींनी सत्ता कायम राखल्यास त्यांचे पाकविषयक कठोर धोरणही परतणार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात संबंध सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, पण याबद्दल विश्लेषक साशंक आहेत. मोदी स्वतःच्या दुसऱया कार्यकाळात स्वतःच्या कथित ‘आक्रमक बचावा’चे धोरण बदलणार की नाही खरा प्रश्न असल्याचे डॉनने म्हटले आहे.

‘इफ मोदी रिटर्न्स’ लेखात जाहिद हुसैन यांनी “मोदी वाजपेयी नाहीत आणि त्या दोघांची तुलना करणे मोठी चूक ठरणार’’ असल्याचे नमूद केले आहे. मोदी दोन्ही देशांमधील समस्यांवर चर्चेऐवजी बळाचा वापर करून तोडगा काढू इच्छितात. इम्रान खान यांच्या शांततेच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद मोदी देतील काय? मोदी स्वतःच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा वेगळे सिद्ध होतील का हे प्रश्न हे महत्त्वाचे s असल्याचे हुसैन यांनी म्हटले आहे.

काश्मीरचा मुद्दा

काश्मीर मुद्यावरूनही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचे आश्वासन दिले आहे. मोदी काश्मीरच्या मुद्यावरील स्वतःचे धोरण बदलतील याचे कोणतेच संकेत नाहीत. या स्थितीमुळे काश्मीरमधील हिंसक घटना वाढणार असल्याने याचा थेट प्रभाव भारत आणि पाकच्या संबंधांवर पडणार असल्याचा दावा एक्स्प्रेस ट्रिब्यूनने केला
आहे.

चर्चेची शक्यता कायम

मोदींना सत्ता गमवावी लागल्यास उग्र राष्ट्रवाद फोफावणे थांबणार आहे. भारताच्या हिंदुत्वकरणाच्या प्रक्रियेला मोठा झटका बसणार असल्याचे लेखात नमूद आहे. भाजपने स्वतःच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादाची बीजे पेरली असून त्याच्या उलट वाटचाल करणे कुठल्याच सरकारला शक्य ठरणार नसल्याचेही लेखात म्हटले गेले आहे. पण इम्रान यांच्याप्रमाणेच स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये काही विश्लेषकांनी सत्ता पुन्हा प्राप्त केल्यावर आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले मोदी पाकिस्तानसोबत चर्चेच्या दिशेने पावले टाकणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पाक विदेश मंत्रालय सक्रीय

नरेंद्र मोदींच्या संभाव्य विजयाच्या अहवालापासूनच पाकिस्तानचे विदेश मंत्रालय आणि त्याच्या सर्व अधिकाऱयांनी आगामी काळातील रणनीतीवर काम सुरू केले आहे. मोदी आणि भाजपने पाकिस्तानविरोधी मार्गावर वाटचाल करण्याचे आश्वासन दिल्याचे ‘द न्यूज इंटरनॅशनल’ वृत्तपत्राने म्हटले आहे. एक्स्प्रेस ट्रिब्यूनमध्ये ‘इफ मोदी लुजेस इलेक्शन’ मथळय़ाने लेख प्रसिद्ध झाला आहे. यात मोदींना ‘डिव्हायडर इन चीफ’चे विशेषण वापरण्यात आले आहे. भाजपच्या दुसऱया कार्यकाळात भारतातील लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचा अंत होईल आणि याचबरोबर सांप्रदायिक तणाव वाढणार असल्याचा दावा लेखात करण्यात आला आहे.

विदेशातील पाकचे मत निराळे

विदेशात राहणाऱया पाकिस्तानी नागरिकांचे मते मात्र वेगळी आहेत. मोदी हेच पुन्हा सत्तेत यावेत असे मत लंडनमध्ये राहणारे पाक उद्योजक रियाझ यांनी व्यक्त केले आहे. मोदी सत्तेवर आल्यास पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादी संघटना नष्ट होतील आणि तेथील दहशतवाद संपविण्याच्या दृष्टीने पाक सरकारवर दबाव निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.